गडचिरोली : विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देणाऱ्या शिक्षकांच्या हातात शाळेत खडू दिसत असला तरी त्याच हातात एका दारूच्या अड्ड्यावर बिअरचे टिन कॅन दिसत असल्याचे फोटो व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे शिक्षक एटापल्ली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेवरील असल्याचे सांगितले जाते.
प्राप्त माहितीनुसार, एटापल्ली पंचायत समितीअंतर्गत शाळांच्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक महोत्सव गेल्या महिन्यात एटापल्लीत झाला. जि.प. हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात हा महोत्सव सुरू असताना काही शिक्षक दिवसाढवळ्या गट्टा मार्गावरील एका दारूच्या ठिय्यावर जाऊन मद्यपान करत असल्याचे फोटोंमध्ये दिसत आहे. हे फोटो समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर पालकांसह सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटणे सुरू झाले.
गळ्यात ओळखपत्र असताना सार्वजनिक ठिकाणी शिक्षक खुलेआमपणे दारूचे ढोस रिचवणारे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना कोणते धडे देत असतील, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. शिक्षक विभागाकडून त्या शिक्षकांवर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.