चामोर्शी : आपले सरकार-कामगिरी दमदार, सबका साथ-सबका विकास-सबका विश्वास असा गजर करत भारतीय जनता पक्ष आणि महिला मोर्चाच्या वतीने आणि माजी खासदार अशोक नेते यांच्या पुढाकाराने चामोर्शीत अभूतपूर्व असा महिला मेळावा झाला. नारीशक्तीच्या सन्मानार्थ गुरूवार, दि.19 रोजी झालेल्या या मेळाव्याला लाडक्या बहिणींनी एकच गर्दी केल्याने बालाजी सभागृह खचाखच भरले होते.
या भव्य मेळाव्याचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री तथा अनु.जाती-जनजाती संसदीय समितीचे अध्यक्ष खा.फग्गनसिंह कुलस्ते यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते होते. यावेळी कुलस्ते म्हणाले, लाडकी बहिण योजना भाजप सरकारने मध्यप्रदेशमध्ये लागू केली. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा ही महत्वाकांक्षी योजना आणली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मला काम करण्याची संधी मिळाली, ते अहोरात्र काम करतात. पण महाराष्ट्रातील जनता लोकसभेत काँग्रेसच्या अपप्रचाराला बळी पडली. काँग्रेसकडे व्हिजन नाही, विकास कामे नाही. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत आपण भाजपला साथ देऊन विजयी संकल्प करा. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अध्यक्षीय मार्गदर्शनात माजी खासदार अशोक नेते यांनी आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांदाला खांदा लावून काम करताना दिसत आहे. संसारातही महिलांचे मोठे योगदान असते. त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी, त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठीच राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना आणली. केंद्र व राज्य सरकार महिला भगिनींच्या भक्कमपणे पाठीशी असून महिलांच्या सशक्तीकरणासाठी सरकारने घेतलेले निर्णय महत्वाचे आहेत, असे ते म्हणाले.
भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने महिलांना नारीशक्ती वंदन या विधेयकाच्या माध्यमातून ३३ टक्के राजकीय आरक्षण देण्यासंबंधीचे विधेयक पारित केले. त्यावेळी मी सुद्धा त्या विधेयकावर स्वाक्षरी केली, याचा मला अभिमान वाटतो. 10 वर्षाच्या कार्यकाळात मी लोकसभेत अनेक प्रश्न मांडून विकासाभिमुख कामे केली. यापुढेही जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहील. महिला भगिनींच्या कोणत्याही समस्या आणि अडीअडचणी असल्यास मी निश्चितपणे सोडवण्याचा प्रयत्न करीन, अशी ग्वाही देत माजी खा.नेते यांनी लोकसभेच्या निवडणुकीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या केलेल्या सहकार्याबद्दल आभारही व्यक्त केले. गडचिरोली, चामोर्शी व धानोरा या ठिकाणी महिलांच्या मदतीकरिता व महिला भगिनींना त्रास होऊ नये याकरिता कार्यालय उघडण्यात आले आहे. ज्या महिलांना अजूनही लाडक्या बहिण योजनेचा लाभ मिळालेला नाही, त्यांनी कार्यालयाशी संपर्क साधावा असे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी मा.खा.अशोक नेते यांच्याकडून या कार्यक्रमाला उपस्थित प्रत्येक महिला भगिनीला भेटवस्तूसुद्धा देण्यात आल्या.
मंचावर आमदार डॉ.देवराव होळी, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, महिला मोर्चाच्या प्रदेश चिटणीस रेखा डोळस, माजी आमदार डॅा.नामदेव उसेंडी, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गिता हिंगे, जिल्हा उपाध्यक्ष तथा आदिवासी आघाडीचे जिल्हा प्रभारी डॅा.मिलिंद नरोटे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत खटी, भाजपचे तालुकाध्यक्ष आनंद भांडेकर, नगरसेवक तथा सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे, जेष्ठ नेते नामदेव सोनटक्के, तालुकाध्यक्ष अनिता रॅाय, नगरसेविका सोनाली पिपरे, जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, प्रतिमा सरकार, जेष्ठ नेत्या आकुली बिशवास, संगिता भोयर, जिल्हा महामंत्री सीमा कन्नमवार, पुष्पा करकाडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन नगरसेविका रोशनी वरघंटे यांनी केले.