सीआरपीएफच्या बाईक रॅलीने वेधले गडचिरोलीकरांचे लक्ष, ठिकठिकाणी स्वागत

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता

गडचिरोली : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या समारोपानिमित्त प्रत्येक घरावर तिरंगा फडकावून देशाच्या मातीशी नाते जोडण्याचा संदेश देण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) वतीने गडचिरोलीत बाईक रॅली काढण्यात आली. तिरंगी ध्वज फडकवत निघालेली ही बाईक रॅली लक्षवेधी ठरली. या रॅलीचे गडचिरोलीकरांनी ठिकठिकाणी उत्साहात स्वागत केले.

सीआरपीएफचे पोलीस उपमहानिरीक्षक (ऑपरेशनल रेंज) आणि 192 बटालियनच्या वतीने आयोजित या बाईक रॅलीत पोलीस उपमहानिरीक्षक जगदीश नारायण मीना यांच्या मार्गदर्शनाखाली सीआरपीएफचे अधिकारी आणि जवान सहभागी झाले होते. “हर घर तिरंगा” आणि “मेरी माती मेरा देश” चा संदेश या रॅलीच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्यात आला. यावेळी देशाच्या स्वातंत्र्याचे आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी विरांनी दिलेले बलिदान याविषयी
अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. ज्या नागरिकाला आपल्या मातीवर प्रेम नाही आणि आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अभिमान नाही, तो कधीही यशस्वी नागरिक होऊ शकत नाही असे ते म्हणाले. ही बाईक रॅली ठिकठिकाणी जात असताना सर्वसामान्य नागरिक, युवक व लहान मुलांनी या रॅलीचे मोकळ्या मनाने स्वागत केले. आपणही प्रत्येक घराघरात तिरंगा फडकवू अशी भावना व्यक्त केली.

ही बाईक रॅली एमआयडीसी, गांधी चौक, धानोरा रोड, सेमाना मार्गे शहरातील विविध भागात फिरून अखेर 192 बटालियनच्या आवारात संपली. यावेळी द्वितीय कमांडिंग ऑफिसर नरेंद्र कुमार, डेप्युटी कमांडंट शिव महेंद्र सिंह, वैद्यकीय अधिकारी सौरभ दत्ता हे देखील रॅलीमध्ये सहभागी झाले होते.