संत निरंकारी मंडळाकडून शुक्रवारी देसाईगंज येथे भव्य रक्तदान शिबिर

मोटारसायकल रॅलीतून जनजागृती

देसाईगंज : येथील संत निरंकारी मंडळ शाखेच्या वतीने शुक्रवार, दि.26 एप्रिल रोजी देसाईगंज (वडसा) येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. आरमोरी मार्गावरील संत निरंकारी सत्संग भवनात सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हे शिबिर चालणार आहे. शिबिराच्या जनजागृतीसाठी बुधवार दि.24 ला संत निरंकारी सेवादलाच्या वतीने शहरात जनजागृतीपर मोटारसायकल रॅली काढण्यात आली. त्यात जवळपास 100 महिला-पुरुषांनी सहभाग घेतला.

सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या प्रेरणेने जिल्ह्यातील सर्वसाधारण गोरगरीब रुग्णांच्या रक्ताची पूर्तता करण्यासाठी जिल्हा रक्तपेढी, जिल्हा रूग्णालय गडचिरोली यांच्या विनंतीनुसार संत निरंकारी मंडळाद्वारे जिल्ह्यात विविध ठिकाणी स्थानिय शाखेद्वारे रक्तदान शिबिराचे आयोजन करून मानवसेवेचे कार्य केले जाते. देशात तसेच गडचिरोली जिल्ह्यातही रक्तदान करण्यात संत निरंकारी मंडळ नेहमी अग्रस्थानी असते.

मागील चार वर्षात कोविड महामारीच्या काळातही मंडळाद्वारे प्रशासनाच्या विनंतीवरून देसाईगंज येथे भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करून अनुक्रमे 160, 130, 170 व 254 युनीट रक्त शासकीय जिल्हा रूग्णालयाला पुरवठा केले आहे.

यावर्षीच्या शिबिरात परिसरातील भाविक व नागरिक मोठ्या संख्येने रक्तदान करणार आहेत. जवळपास 250-300 महिला-पुरुष रक्तदान करतील, अशी अपेक्षा संत निरंकारी मंडळाचे झोनल इंचार्ज किशन नागदेवे यांनी व्यक्त केली आहे. सर्व मानवप्रेमी जनतेने रक्तदान शिबिरात भाग घेवून रक्तदानाच्या महान कार्यात सहभागी व्हावे अशी विनंतीही त्यांनी केली आहे.