कोरची : दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कोरची तालुक्यातील मोहगाव येथे आदिवासी कंवर समाजाचा सामूहिक विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. या सामूहिक विवाह सोहळ्यात 10 जोडपी विवाहबद्ध झाली.
सदर कार्यक्रमाची सुरुवात कंवर समाजाच्या रीतिरिवाजाने झाली. आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे हे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या सोहळ्याला अध्यक्ष म्हणून म.रा.आ.वि.म. नाशिकचे संचालक भरत दूधनांग, तर अतिथी म्हणून काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल, क्षेत्र अध्यक्ष आदिवासी कंवर समाज भिकम फुलकंवर, देवरी पंचायत समितीचे सभापती अबिंका बंजार, प्रा.देवराव गजभिये, प्रा.गणेश सोनकलंगी, राधेश्याम फुलकुंवर, पितांबर आरूदुल्ला, चेतन जमकातन, माजी जि.प.सदस्य पद्माकर मानकर, रुखमन घाटघुमर, नगरसेवक मेघश्याम जमकातन, आशिष अग्रवाल, सुन्हेर सोंनटापर, लग्नुराम कार्यपाल, प्रेमसिंग जमकातन, फिरोज फुलकंवर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी समाजाचे जनक सीताराम कंवर, बाबुराव शेडमाके आणि वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून व विधिवत पूजन करून करण्यात आली.
या सामूहिक विवाहामुळे निसर्गाचे रक्षण केले जात असून पैश्याची व वेळेची बचत केली जात आहे. सर्व कंवर समाज एकत्र येण्याचे सुध्दा हे माध्यम असल्याचे प्रतिपादन आमदार कृष्णा गजबे यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कंवर समाजाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.