अहेरीत बुद्ध जयंती उत्साहात साजरी, खिर व अन्नदानाचाही कार्यक्रम

सामूहिक त्रिशरण व पंचशील ग्रहण

अहेरी : येथील बौद्ध विहाराच्या प्रांगणात ज्ञान प्रसारक मंडळाच्या वतीने सोमवारी (12 मे) बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सेवानिवृत्त वनअधिकारी कनकदास ढोलगे यांच्या हस्ते पंचशिल ध्वज फडकावून सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. त्यानंतर महाकारुनिक तथागत गौतम बुद्ध व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलीत करून अभिवादन करण्यात आले.

वैशाख पौर्णिमा बुद्ध जयंती निमित्ताने तिरूपती चालूरकर यांच्यातर्फे खिर दान व मंडळाच्या वतीने अन्नदान करण्यात आले. भीम गायक व प्रबोधनकार रमेश शेंडे आणि त्यांचे सहकारी जगदीश शिंदे यांनी उत्कृष्ट भीमगीत सादर केले.

याप्रसंगी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सुरेंद्र अलोणे यांनी साऱ्या जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम यांच्या जीवनावर प्रकाश टाकून मानव कल्याणासाठी तथागत गौतम बुद्ध यांच्या विचाराने व बुद्ध तत्वज्ञानाने प्रेरित होऊन त्या दिशेने वाटचाल करावी, असे म्हणत मार्गदर्शन केले. यावेळी प्रशांत भिमटे यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन राहुल गर्गम यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध उपासक व उपासिका उपस्थित होते. कार्यक्रमासाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.