ऑस्ट्रेलियन तंत्रज्ञानाच्या मदतीने देणार गडचिरोलीत अभियांत्रिकी प्रशिक्षण

कर्टीन विद्यापीठासोबत सामंजस्य करार

गडचिरोली : गडचिरोलीत युवकांना धातुशास्त्र, खाणकाम व कॉम्प्युटर सायन्ससह अन्य विषयातील अभियांत्रिकी प्रशिक्षण देण्यासाठी स्वायत्त ‘विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था’ स्थापन करण्याबाबत गोंडवाना विद्यापीठ व लॉयडस् मेटल्स यांच्यात करार करण्यात आला. याला ऑस्ट्रेलियन तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे. त्यासाठी गोंडवाना विद्यापीठ व पश्चिम ऑस्ट्रेलियातील कर्टीन विद्यापीठ यांच्यात जुळे कार्यक्रम (ट्विनिंग डिग्री) आयोजित करण्याबाबतही करार करण्यात आला आहे. याचे सकारात्मक व दूरगामी परिणाम जिल्ह्याच्या विकासावर होईल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गोंडवाना विद्यापीठाचे लॉयडस् मेटल्स आणि ऑस्ट्रेलियातील कर्टीन विद्यापीठासोबत सामंजस्य करार झाले आहेत. यातून मुलभूत सोयीसुविधांच्या कमतरतेने पछाडलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आधुनिक तंत्रज्ञानाचे वारे वाहणार आहेत.

मुंबईतील राजभवनात बुधवारी (दि.7) या सामंजस्य करारांचे आदान-प्रदान करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार परिणय फुके, ऑस्ट्रेलियाचे मुंबईतील वाणिज्यदूत पॉल मर्फी, कर्टीन विद्यापीठाचे प्र-कुलगुरु मार्क ऑग्डन, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे, लॉयडस् मेटल्स अॅन्ड एनर्जी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, राज्यपालांचे सचिव डॉ.प्रशांत नारनवरे तसेच विद्यापीठाचे संवैधानिक अधिकारी तथा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.

गडचिरोली जिल्ह्यात खाण उद्योगांचा वाढता विस्तार पाहता प्रशिक्षित अभियंत्यांची गरज भासणार आहे. त्यामुळे गडचिरोलीतच योग्य ते प्रशिक्षण घेऊन युवकांना जिल्ह्यातच रोजगाराच्या संधी वाढतील, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.