गडचिरोली : मूळचे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातल्या कुकामेट्टा गावचे रहिवासी, पण अनेक वर्षांपासून नवी दिल्लीतील श्याम लाल महाविद्यालयात राज्यशास्राचे प्रोफेसर असलेले विवेकानंद नरताम यांनी नालंदा विद्यापीठात सी-20 द्वारे घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग घेतला. मानवी मूल्ये आणि मानवी अधिकार (ह्युमन राईट्स अॅज ह्युमन व्हॅल्युज) या विषयावरील या परिषदेत त्यांनी आदिवासींच्या अधिकाराची बाजू सशक्तपणे मांडली.
भारतातील आदिवासी समुदायाचे समाज जीवन, संस्कृति आणि परंपरा हा त्यांच्या आवडीचा आणि अभ्यासाचा विषय आहे. ते भारतातील आदिवासी मूल्य व्यवस्थेच्या संरक्षणाविषयी अत्यंत आग्रही आहेत. त्यांनी आदिवासी समुदायाच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणासंबंधी विचार संसद टीवी आणि तत्सम अनेक व्यासपीठांवर मांडलेले आहेत. जागतिक ख्यातीच्या नालंदा विद्यापिठात पार पड़लेल्या या आंतरराष्ट्रीय परिषदेत देखील त्यांनी आधुनिक काळातल्या मानवी अधिकारासंबंधी संकल्पनांमध्ये आदिवासी समुदायाच्या मूल्य व्यवस्थेस योग्य स्थान दिले जावे, अशी बाजु मांडली. या परिषदेत चर्चा केलेल्या मुद्यांची संकलित पुस्तिका G20 च्या नेत्यांना सुपुर्द केली जाणार आहे.
G20 हा जागतिक स्तरावर आर्थिक अणि राजनितिक दृष्टया महत्वाच्या राष्ट्रांचा समूह आहे. G20 चे अध्यक्षस्थान यावर्षी भारताकडे आहे. C20 च्या माध्यमतून जागतिक नागरी समुदाय, उदा. NGOs आणि अनेक संस्थांद्वारे जागतिक नेत्यांसमोर मानवी समुदायाचा विकास आणि धोरणात्मक सुधारणांसंबंधी विचार मांडले जातात. C20 च्या माध्यमातून देशातील विविध शहरांमध्ये विविध विषयांवर असे कार्यक्रम घेतले जात आहेत.