गडचिरोली : राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम बुधवार, 20 सप्टेंबर रोजी कोरची येथील बैठक आटोपून वैरागड येथे येणार आहेत. कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांच्या प्रथम आगमनाप्रित्यर्थ भोलू सोमनानी मित्रपरिवार आणि गावकऱ्यांच्या वतीने स्वागत आणि जाहीर सत्कार ठेवण्यात आला आहे.
हा कार्यक्रम भोलू सोमनानी यांच्या घरासमोरील पटांगणात आयोजित केला आहे. गेल्या 20 वर्षांपासून सोमनानी यांच्यावतीने दरवर्षी साजऱ्या केल्या जाणाऱ्या गणपती उत्सवात 10 दिवस विविध उपक्रम घेतले जातात. शेवटच्या दिवशी १० हजारावर भाविक महाप्रसाद घेतात. त्यामुळे हा गणपती उत्सव वैरागडच नाही तर आरमोरी तालुक्यात प्रसिद्ध आहे. त्यामुळे ना.धर्मरावबाबा आत्राम हेसुद्धा यावर्षी या गणपतीचे दर्शन घेऊन भोलू सोमनानी यांच्या घरी सदिच्छा भेट देणार आहेत.