जिमलगट्टा पोलिसांनी जप्त केली पावणेदोन लाखांची देशी दारू

घरात लपवून ठेवलेला साठा पकडला

गडचिरोली : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर छुप्या मार्गाने होणारी दारूची आयात आणि विक्री वाढली आहे. अशातच अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा उपपोलिस स्टेशनच्या पथकाने तुमलबोडा या गावातील एका घरातून तब्बल एक लाख ७५ हजार रुपये किमतीचा देशी दारूचा साठा जप्त करून आरोपींना अटक करण्यात आली.

जिमलगट्टा येथील सत्यप्रकाश यादव आणि त्याचा भाऊ रामनरेश साहेबसिंग यादव हे दोघे मौजा तुमलबोडा (किष्टापूर टोला) येथील बक्का बोडका तलांडी याच्या घरी अवैधरित्या रॉकेट देशी दारुचा साठा करुन वेगवेगळ्या दारु विक्रेत्यांना व चिल्लर विक्रीकरीता देत होता. उपविभागीय पोलिस अधिकारी सुजीतकुमार क्षीरसागर, उप पोस्टे जिमलगट्टाचे प्रभारी अधिकारी सपोनि संगमेश्र्वर बिराजदार व पोलिस स्टाफ यांनी पंचांसह छापा मारला असता तलांडी याच्या घरातील एका कोपऱ्यात मोठ्या प्रमाणात दारूच्या सिलबंद बाटल्या आढळल्या. त्याची किंमत १ लाख ७५ हजार आहे.

सदर मुद्देमाल आदेश सत्यप्रकाश यादव, रामनरेश साहेबसिंग यादव आणि मनोज मुजुमदार यांनी विक्रीकरीता साठवून ठेवल्याचे तलांडी याने सांगितले. त्यातील दोघांना अटक करण्यात आली.