गडचिरोली : निवडणूक म्हटले की घरासमोरून भोंगे वाजवत एकामागून एक फिरणारी वाहने, त्यावरील विविध गाणी, उमेदवारांचे बिल्ले आणि ‘अमूक उमेदवारालाच आपले अमुल्य मत देऊन प्रचंड बहुमताने विजयी कसा’ असे वाक्य ऐकून-ऐकून पिकून जाणारे कान, असे चित्र १०-१५ वर्षापूर्वीपर्यंत प्रत्येक लोकसभा-विधानसभा निवडणुकीत राहात होते. पाच वर्षापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीतही ते काही प्रमाणात कायम होते. पण यावेळचे चित्र पाहून निवडणुकीचा ज्वर अद्याप चढलाच नाही, अशा प्रतिक्रिया जिल्ह्यात सर्वदूर उमटत आहेत.
येत्या १९ एप्रिल रोजी म्हणजे अवघ्या चार दिवसांनी मतदान करायचे आहे. पण अनेक मतदारांना किती आणि कोण-कोण उमेदवार रिंगणात आहेत याची माहितीच नाही. केवळ महायुतीकडून विद्यमान खासदार अशोक नेते आणि महाविकास आघाडीकडून डॅा.नामदेव किरसान ही दोनच नावे लोकांना माहित आहेत. त्यामुळे खरा सामना या दोन उमेदवारांमध्येच रंगणार यात शंका नाही.
शहरी किंवा ग्रामीण भागात कोणत्याही पक्षाच्या प्रचारासाठी भोंगे लावलेल्या गाड्या फिरताना दिसत नाहीत. दक्षिण गडचिरोलीच्या भागात महायुतीच्या काळातील कामे, योजनांची माहिती देऊन महायुती, मोदींना विजयी करण्यासाठी भाजपची यंत्रणा काम करत आहे. तसेच काँग्रेसची काही वाहने कुरखेडा, कोरची, धानोरा तालुक्यात फिरत आहेत. पुढील दोन दिवसांत त्यांना बराच पल्ला गाठावा लागणार आहे.
स्मार्ट फोनमुळे बदलली प्रचार पद्धती
पूर्वी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी घरोघरी जाऊन पॅाम्प्लेटचे वाटप केले जात होते. त्या पॅाम्प्लेट्समध्ये उमेदवाराचा फोटो, बोधचिन्ह आणि जाहीरनाम्यासह महत्वाचे मुद्देही नोंदविले जात असत. त्यामुळे कोण उमेदवार कसा आहे, त्याचे चिन्ह काय आहे आणि तो कोणत्या मुद्द्यांना फोकस करत आहे हे स्पष्ट होत होते. पण या निवडणुकीत तसे वातावरण कुठेही दिसत नाही. बहुतांश घरांमध्ये आणि युवा वर्गात प्रत्येकाच्या हाती आलेल्या स्मार्ट फोनमुळे आता मोबाईलवरूनच उमेदवारांची माहिती किंवा प्रचार करण्याकडे कल वाढला आहे. मात्र प्रमुख उमेदवारांशिवाय इतर उमेदवारांकडे त्याबाबतची यंत्रणा नसल्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात इतर कोण-कोण उमेदवार आहेत हे अनेकांना माहित नाही.