दोन वाहनांमध्ये आढळलेली ‘ती’ ११ लाखांची रक्कम कुठे जात होती?

व्हिडीओ चित्रीकरणात केली जप्त

गडचिरोली : लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या तपासणी पथकाने रात्री दोन प्रकरणात एकूण 11 लाख 100 रुपयांची रोकड जप्त केली. ही रक्कम कोणाची, कुठून कुठे जात होती, ती कुठून आली आणि त्या रकमेचा वापर अधिकृत कामासाठीच केला जात होता की आणखी कशासाठी, याचा तपास संबंधित यंत्रणा करीत आहे.

गेल्या 16 मार्चला लागलेली निवडणूक आचारसंहिता लोकसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याच्या तारखेपर्यंत लागू राहणार आहे. यादरम्यान ठिकठिकाणी व्हिडिओ सर्वेक्षण पथक, भरारी पथक, स्थिर सर्वेक्षण पथकाद्वारे तपासणी करण्यात येत आहे.

यातील भरारी पथक क्रमांक 126801 यांना 14 एप्रिलच्या रात्री 9.30 वाजता गडचिरोलीच्या शासकीय विज्ञान महाविद्यालयाजवळील महादेव मंदिरासमोर नाकाबंदी दरम्यान एका पांढऱ्या रंगाच्या कारवर पथकाला संशय आला. त्यामुळे तपासणी केली असता कारच्या मागच्या शिटवर 10 लाख 100 रुपये असलेली बॅग आढळून आली. याबाबत वाहन चालकाला समाधानकारक उत्तर देता न आल्याने गडचिरोलीचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या निर्देशानुसार भरारी पथक प्रमुख खेमराज लेगनुरे यांनी सदर रक्कम जप्त केली. सदर रक्कम जप्त करुन वाहनचालकास जप्ती पावती देण्यात आली. सदर रक्कमेबाबत आर्थिक उलाढालीची कागदपत्रे समक्ष प्राधिकाऱ्यांकडे सादर करण्याबाबत सूचना देण्यात आली.

दुसऱ्या एका कारवाईत रात्री 9.50 वाजताच्या सुमारास एक पांढऱ्या रंगाच्या फोर्ड कंपनीच्या चारचाकी वाहनाच्या समोरील डिक्कीत एक लाख रुपये रोख आढळून आले. सदर रक्कम घराच्या बांधकामाकरिता भावाकडून आणली असल्याचे सांगण्यात आले. परंतु सदर रोख रकमेबाबत खात्री करण्यासाठी भरारी पथकाने सदर रक्कम जप्त करून आर्थिक उलाढालीचे कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

दोन्ही प्रकरणात तपास सुरु असल्याची माहिती आदर्श आचारसंहिता समितीचे नोडल अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी दिली.