गडचिरोली : न्यायालयातील प्रलंबित खटल्यांचा विचार करता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील न्यायालयात 9 डिसेंबरला लोकअदालतीचे आयोजन केले होते. यात 104 प्रलंबित आणि 196 दाखलपूर्व खटले आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आले.
तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, 138 एन.आय. ॲक्ट प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे, बँकेशी संबंधीत प्रकरणे, तसेच वाद दाखलपुर्व प्रकरणांमध्ये टेलीफोन, मोबाईल कंपनी संबंधी वाद, महाराष्ट्र राज्य वीज वितरण प्रकरणे, पतसंस्थेशी संबंधीत प्रकरणे, नगर परिषदेअंतर्गत कर आकारणीची प्रकरणे, तसेच जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच येथील प्रकरणे इत्यादी मामल्याकरीता राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून 104 प्रलंबित आणि 196 दाखलपूर्व खटले आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. यात 3,14,53,699 रुपयांची वसुली करण्यात आली. किरकोळ स्वरुपाच्या प्रकरणामध्ये 76 प्रकरणे गुन्हा कबुलीद्वारे निकाली काढण्यात आली.
मोटार वाहन कायदाअंतर्गत चालान प्रकरणांपैकी एकुण 197 प्रकरणे निकाली व रक्कम 1 लाख 19,580 रुपयांची वसुली करण्यात आली.
अन् त्यांचा संसार पुन्हा सुरळीत झाला
एका वैवाहिक वादाच्या प्रकरणात पती-पत्नीचा समझोता होवून पत्नी नांदायला गेल्याने अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख व सत्र न्यायाधिश यु.बी.शुक्ल यांनी समस्त न्यायाधिशवृंदांच्या उपस्थितीत उभयतांचा साडी-चोडी व शेला देवून सत्कार केला. जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यु.बी. शुक्ल तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली यांच्या देखरेखीखाली लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते.
न्याय आपल्या दारी
त्याचप्रमाणे मोटार अपघात नुकसानभरपाईच्या एका प्रकरणातील अर्जदार ही मयत इसमाची वयोवृध्द आई होती. त्यांना त्यांचे नातेवाईक वाहनाने न्यायालयात घेवून आले होते. परंतु त्यांना चालता येत नसल्याने न्यायालयात पहिल्या मजल्यावरील पॅनल समोर उपस्थित राहता येत नव्हते.त्यावर जिल्हा न्यायाधिश -1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधिश तथा पॅनल प्रमुख मुधोळकर यांनी स्वत:न्यायालयाबाहेर येवून त्या वाहनाजवळ जावून सदर अर्जदार महिलेस तडजोडीचे मुद्दे समजावून सांगितले व पडताळणी केली. न्यायाधिश या संवेदनशीलतेबाबत पक्षकारांनी व उपस्थितांनी समाधान व्यक्त केले व न्याय आपल्या दारी या उक्तीचा सर्वाना प्रत्यय आला.