जुनी पेन्शन जनक्रांती महामोर्चात शिक्षक परिषद सहभागी होणार

शिक्षक, कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

गडचिरोली : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेद्वारे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर १२ डिसेंबरला काढण्यात येणाऱ्या जुनी पेन्शन जनक्रांती महामोर्चात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद सहभागी होणार आहे. त्यामुळे या महामोर्चात जिल्ह्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे संतोष सुरावार यांनी केले आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने जुनी पेन्शन संपुष्टात आणून डीसीपीएस योजना सुरू केली तेव्हा या पेन्शन योजनेवर एकाही शिक्षक आमदारानी विधानपरिषद, विधानसभेमध्ये आवाज उठवला नाही. फक्त आमदार नागो गाणार यांनी डिसेंबर २०१० मध्ये शिक्षक आमदार म्हणून निवडून आल्यावर १९ जुलै २०११ ला जुन्या पेन्शनचा मुद्दा प्रथम मांडून लढा सुरू केला. तेव्हापासून वेळोवेळी त्यांनी या मुद्द्यावर सभागृहात आवाज उठवण्यासोबत मंत्र्यांनाही निवेदने दिली आहेत. मात्र आतापर्यंत सर्वांकडून टोलवाटोलवी झाली.

शासन व प्रशासन पेन्शनचा गंभीर प्रश्न गांभीर्याने घेत नसल्याने, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर १२ डिसेंबर २०२३ रोजी पेन्शन जनक्रांती महामोर्चा काढला जाणार आहे. महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे सर्व पदाधिकारी आणि शिक्षक, कर्मचारी यात सहभागी होत आहेत.

हा महामोर्चा यशस्वी करण्यासाठी माजी शिक्षक आमदार नागो गाणार, राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू, राज्य सरकार्यवाह राजकुमार बोनकिले, राज्य कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, माजी आमदार भगवानराव साळुंखे, पुजाताई चौधरी, नरेंद्र वातकर, किरण भावठनकर, नागपूर विभागीय अध्यक्ष अजय वानखेडे, विभागीय कोषाध्यक्ष संतोष सुरावार, कार्यवाह सुभाष गोतमारे, उपाध्यक्ष मधुकर मुपिडवार, गडचिरोली जिल्हा माध्यमिक विभाग कार्याध्यक्ष गोपाल मुनघाटे, जिल्हाध्यक्ष अनिल नुतिलकंठावर, कार्यवाह सागर आडे, कोषाध्यक्ष जीवन उईके, संघटन मंत्री विश्वजीत लोणारे, दिलीप तायडे, मृणाल तुम्पलीवार, प्राथमिक विभागचे संतोष जोशी, पुरुषोत्तम नन्नावरे, शामराव बंडावार, कुमारी कल्पना खेडुलकर, पंढरी पोफरे तसेच सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.