गडचिरोली : निवडणुकीमुळे चंद्रपूर, नागपूरकडून गडचिरोली जिल्ह्यात येणाऱ्या बसगाड्यांची सीमेवर तपासणी केली जात आहे. त्यामुळे बसमधून प्रवास करताना बॅगमध्ये कोणती संशयास्पद वस्तू तर नाही ना, याची खबरदारी प्रवाशांना घ्यावी लागणार आहे.
निवडणुकीच्या काळात मतदारांना पैसे, दारू किंवा अन्य कोणत्या गोष्टीचे प्रलोभन देणे गुन्हा ठरते. याशिवाय नक्षलग्रस्त जिल्हा असल्यामुळे नक्षलवाद्यांसाठी कोणत्या संशयास्पद वस्तुची तर कोणाच्या माध्यमातून वाहतूक केली जात नाही ना, याचीही तपासणी पोलिसांकडून केली जात आहे.
गडचिरोली हा दारूबंदी असलेला जिल्हा असल्यामुळे या जिल्ह्यात दारूचे मतदारांना मोठे आकर्षण असते. त्यामुळे लगतच्या जिल्ह्यांमधून खासगी वाहने, बसमधून दारूची तर आयात केली जात नाही ना, याची तपासणी जिल्ह्याच्या सीमेवर उभारलेल्या अस्थायी तपासणी नाक्यांवर केली जात आहे. प्रवाशाच्या बॅगमध्ये आढळणाऱ्या मोठ्या रोख रकमेकडेही संशयास्पद नजरेने पाहिले जाते. त्यामुळे अशी रक्कम कोणाकडे आढळल्यास त्या रकमेचे सविस्तर विवरण संबंधित प्रवाशाला द्यावे लागणार आहे.