गडचिरोली : ज्या वयात शाळेत जावून शिकायचे, खेळायचे त्या वयात हातात वेगवेगळ्या कामाच्या जबाबदाऱ्या घेऊन जे बालक स्वतःच्या आणि आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी म्हणतात अशा २१ बाल कामगारांना कामातून मुक्त करण्यात आले. शासनाच्या नियमानुसार 18 वर्षांखालील बालकांना कामावर ठेवणे गुन्हा आहे. पण तरीही हॉटेल, धाबे, विविध दुकाने आदी ठिकाणी बालक कामगार ठेवले जातात.
जागतिक बाल कामगार विरोधी दिवसानिमित्त जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय गडचिरोली व स्पर्श संस्था गडचिरोली अंतर्गत कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फांउडेशन, चॉईल्ड लाईन व पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने गडचिरोली शहरात राबविलेल्या शोधमोहिमेत अनेक ठिकाणी बाल कामगार आढळले.
दि.12 जूनला जिल्हाधिकारी कार्यालय येथे परिविक्षाधिन आयएएस अधिकारी ओंकार पवार यांच्या हस्ते सदर बाल कामगार शोधमोहित राबविण्याकरिता हिरवी झेंडी दाखवून शुभांरभ करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष वर्षा मनवर, स्पर्श संस्थेचे अध्यक्ष डॉ.दिलीप बारसागडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकरी अविनाश गुरनुले व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
गडचिरोली शहरात 18 वर्षाखालील बालकांना ताब्यात घेण्याकरिता वेगवेगळ्या भागात मोहिम राबविण्याकरिता 3 टिम बनवण्यात आल्या. यात २१ बालकामगार आढळले. 18 वर्षांखालील बालकांना कामावर ठेवणे गुन्हा असल्याचे संबंधितांना सांगण्यात आले.