गडचिरोली : ग्रिन्स किलबिल नेचर क्लबच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘मामाच्या गावाला जाऊया’ हे तीन दिवसीय विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात सहभागी चिमुकल्यांनी निसर्गाच्या सानिध्यात धमाल करत मनोरंजनातून ज्ञानही लुटले.
गडचिरोलीपासून जवळच असलेल्या चामोर्शी-शिवणी महामार्गावरच्या वाकडी गावाजवळील साई इन्स्टिट्यूट आॅफ नर्सिंग अॅण्ड मेडीकल सायन्स येथे आयोजित या शिबिरात सहभागी चिमुकल्यांनी पक्षिनिरीक्षण तर केलेच, सोबत शिबिरस्थळी उभारलेल्या तंबूमध्ये विविध वृक्षांच्या बिया मातीत कालवून वैशिष्ट्यपूर्ण देखणे किल्ले तयार केले, आपल्या पंजाच्या आकाराचे कागद कापून ते विविध रंगांनी रंगवून त्यापासून विदुषक बनवला. निसर्ग निरीक्षण करताना पळसाची पाने तोडून त्यातून पत्रावळ, द्रोण तयार करायचे शिकून त्यातच जेवणही केले.
लगोरी, गुल्यार, कंचे असे अनेक विस्मृतीत गेलेले खेळ बच्चेकंपनी खेळली. शिवाय अत्याधुनिक टेलिस्कोपद्वारे आकाशदर्शनही केले. परीसरात दिसलेल्या वाळलेल्या काटक्या, गवत आणि इतर नैसर्गिक वस्तूंचा वापर करून प्लास्टिकच्या बाटल्यांपासून पक्ष्यांसाठी त्यांनी घरटीही तयार केली. नदीच्या वाळूत खेळत शंख-शिंपले गोळा केले, छोट्या शंखांची शिटी केली, तर विविध दगडांना लयीत वाजवत अनोखे संगीतही निर्माण केले. याशिवाय इतरही अनेक प्रकारचे उपक्रम या तीन दिवसीय शिबिरात घेण्यात आले.
शिबिर प्रमुख म्हणून संस्थेच्या अध्यक्ष अंजली कुळमेथे यांनी जबाबदारी सांभाळली. मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे यांनी शिबिरार्थ्यांना पक्षीनिरीक्षण शिकवले. सोबत निसर्गविषयक अनेक प्रकारची माहिती दिली. पंडित जवाहरलाल नेहरू शाळेचे मुख्याध्यापक सुधीर गोहणे यांनी शिबिरार्थ्यांना विविध कला व उपक्रमांत मार्गदर्शन केले. नागपूरहून आलेले मनोज सुतार यांनी अनेक प्रकारचे पारंपरिक खेळ शिकवले. तसेच नागपूरचे खगोलतज्ज्ञ ऋतुराज मावळणकर व कपिल पांडव यांनी अतिशय भव्य व अत्याधुनिक टेलिस्कोपद्वारे आकाशदर्शन घडवताना विद्यार्थ्यांना आकाश निरीक्षण, ग्रह, तारे, धुमकेतू, कृष्णविवर, राशी, नक्षत्रांचा इतिहास अशी अनेक प्रकारची माहिती रंजक पद्धतीने दिली. तसेच चिमुकल्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देत त्यांचे ज्ञानवर्धन केले.
या शिबिरासाठी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॅा.प्रशांत बोकारे, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, तालुका आरोग्य अधिकारी डॅा.अमित साळवे, वैशाली साळवे यांनी सहकार्य केले. तसेच शिबिरासाठी शमशेरखान पठाण, सुरेश लडके, प्राचार्य डॅा.राजाभाऊ मुनघाटे, ग्रिन्स संस्थेचे शेमदेव चाफले, सुभाष धंदरे, राजेश इटनकर, संजय शेगावकर, मिरा बिसेन, निलेश पटले, हेमंत जंबेवार, वनपरिक्षेत्र अधिकारी हेमके, किशोर पाचभाई, सतीश चिचघरे, माधुरी दहिकर, कौस्तुभ दहिकर, खुशाल ठाकरे, शोभा वाकडे आदींनी सहकार्य केले.
आकाश दर्शनासाठी मुलांनी केला साखरझोपेचा त्याग
शिबिरात रात्री खगोल तज्ज्ञ ऋतुराज मावळणकर आणि कपिल पांडव यांनी शिबिरार्थ्यांना १२ राशी, २७ नक्षत्रांची निर्मिती, त्यांची उपयोगीता, सुपर जायंट स्टार, सुपर नोव्हा, आकाशातील नक्षत्र बघून वेळ कशी ओळखायची, सप्तर्षी बघून ध्रुवतारा कसा शोधायचा अशी बरीच माहिती दिली. शिवाय पूर्वेकडे उदीत झालेला वृश्चिक राशीचा तारका समूह आणि पश्चिमेकडील सिंह राशीचा तारका समूहसुद्धा दाखवला. मात्र त्या रात्री क्षितिजावर चंद्रासह अनेक महत्त्वाचे ग्रह नव्हते. त्यांना बघायला पहाटे ४ वाजता आकाश दर्शन करावे लागणार होते. त्यासाठी सर्व मुले तयारी झाली. दुसऱ्या दिवशी सर्व चिमुकले शिबिरार्थी आपल्या साखरझोपेचा त्याग करून भल्या पहाटे आकाश दर्शनासाठी हजर झाले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा प्रताप शिंदेसुद्धा त्यांच्या मुलासह आकाशदर्शनासाठी आले होते. बालकांनी टेलिस्कोपमधून विलोभनीय चंद्र आणि शनीचे स्पष्टपणे निरीक्षण केले.