मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना मुंबईच्या डॅाक्टरांनी दिला विश्रांती घेण्याचा सल्ला

धावपळीमुळे पाठ व कंबरदुखीचा त्रास

गडचिरोली : राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना निवडणुकीच्या धावपळीत विश्रांती न घेतल्यामुळे पाठ व कंबरदुखीचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे डॅाक्टरांनी त्यांना नियोजित दौरे रद्द करून विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत.

प्राप्त माहितीनुसार, ना.आत्राम यांना पाठ व कंबरदुखीचा आजार काही महिन्यांपासून सुरू होता, मात्र त्यांनी या दुखापतीकडे दुर्लक्ष करून लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारात स्वतःला झोकून दिले होते. कंबरेला पट्टा बांधून ते संपूर्ण लोकसभा क्षेत्रात प्रचारासाठी फिरले. त्यामुळे तब्येतीकडे झालेले दुर्लक्षच आता त्यांच्या दुखापतीसाठी कारणीभूत ठरले आहे. त्यामुळे डॅाक्टरांनी त्यांना सक्तीने विश्रांती घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे त्यांना गडचिरोलीचा नियोजित दौराही रद्द करावा लागला. विश्रांतीनंतर ते लवकर बरे होतील असेही डॅाक्टरांनी म्हटले आहे.