चामोर्शी : येथे बैलपोळ्याप्रमाणेच, किंबहुना त्यापेक्षाही जास्त उत्साह तान्हा पोळ्याचा दिसून आला. मंगळवारी चामोर्शी नगर पंचायत समोरील बाजार चौकात भरलेल्या तान्हा पोळ्याचे उद्घाटन माजी खासदार तथा भाजपचे राष्ट्रीय महामंत्री (अनुसूचित जनजाती मोर्चा) अशोक नेते यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि फित कापून करण्यात आले. अशा सण-उत्सवातून हिंदू संस्कृती जपली जाते. त्यामुळे यात सर्वांनी उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी अशोक नेते यांनी केले.
या तान्हा पोळ्यात लाकडी नंदीबैलांना सजवून आणि विविध वेशभूषेत, सामाजिक प्रतिमा साकारत बालगोपाल मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. यानिमित्ताने बेटी बचाव, बेटी पढाओ, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आदींबाबत जनजागृतीही केली जात होती. त्यांचे माजी खा.नेते यांनी कौतुक केले. या चांगल्या उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी नगरसेवक आशिष पिपरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करत तान्हा पोळ्यात सहभागी सर्व बालगोपालांना आपल्या वतीने भेटवस्तू दिल्या.
याप्रसंगी मंचावर तालुका संघचालक किशोर ओल्लालवार, प्राचार्य हिराजी बनपुरकर, सामाजिक नेते माणिक तुरे, कार्यक्रमाचे आयोजक युवा नेते तथा नगरसेवक आशिष पिपरे, आयोजक अमोल आईचवार, सामाजिक नेत्या बिनाराणी होळी, माजी न्यायाधीश दीक्षित, नगरसेविका रोशनी वरघंटे, नगरसेविका सोनाली पिपरे, प्रेमा आईचवार, पोलीस निरिक्षक कातबाने, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर पेटकर, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष अनिता रॅाय, जिल्हा सचिव माधवी पेशट्टीवार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, भाजपचे जिल्हा सचिव दिलीप चलाख, प्रतिक राठी, ॲड.सुरज मेकरत्तीवार,प्रफुल भांडेकर, तसेच मोठया संख्येनी शहरातील नागरिक, महिला व बालगोपालांची उपस्थिती होती.