गडचिरोली : शाळाबाहय, अनियमित आणि स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी 17 ते 31 ऑगष्ट 2023 या कालावधीमध्ये बालकांची शोधमोहीम राबविली जात आहे. यात घरोघरी, बसस्थानक, सार्वजनिक ठिकाणे, बाजाराचे ठिकाण, विटभट्टया, सर्व गावे, वाड्या, पाडे, शेतमळयात, जंगलात वास्तव्य करणाऱ्या पालकांच्या शाळाबाहय बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क अधिनियम 2009 अंतर्गत 6 ते 14 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकास मोफत व सक्तीचे शिक्षण घेण्याचा हक्क प्राप्त आहे. त्यानुसार 17 ते 31 ऑगष्ट 2023 या कालावधीमध्ये विशेष शोधमोहिम राबवून 3 ते 18 वयोगटातील शाळाबाहय, अनियमित व स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी सर्व कार्यालयांसोबत समन्वय साधून शाळाबाहय बालकांचा शोध घेतला जाणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.
गडचिरोली जिल्ह्यातील अनेक कुटुंब उदरनिर्वाहासाठी तेलंगाणा, छत्तीसगड या राज्यात जातात. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडतो. रोजगाराची अनिश्चितता, सामाजिक असुरक्षितता व पालकांच्या मनातील भिती यामुळे बालमजुरी व
बालविवाहांचे प्रमाण वाढत आहे. अशा स्थलांतरीत बालकांना शिक्षण हक्क अधिनियम 2009 कलम (4) नुसार शिक्षण हमी कार्ड देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
ही मोहीम यशस्वी करण्याकरीता अधिनस्त सर्व कर्मचाऱ्यांना सर्वेक्षण प्रभाविपणे राबविण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत, असे शिक्षणाधिकारी (प्राथ.), जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी कळविले.