अन् अम्ब्रिशराव आत्राम पोहोचले जीवन प्राधिकरणच्या कार्यालयात

अहेरीत पाण्याचा समस्येने नागरिक बेजार

जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या आवारात महिलांशी चर्चा करताना अम्ब्रिशराव आत्राम

अहेरी : गेल्या दोन वर्षांपासून पिण्याच्या पाण्याच्या समस्येने अहेरीतील नागरिक हवालदिल झाले आहेत. गढूळ पाणी, जंत व कृमीयुक्त पाणी पुरवठा नेहमीच होत असतो. वेळी-अवेळी आणि पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होत नसल्याने नागरीकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार नागरिक ही समस्या घेऊन येत असल्याने अखेर शुक्रवारी माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी तडक जीवन प्राधिकरण कार्यालय गाठले. त्यामुळे उपस्थित कर्मचाऱ्यांची काळी वेळ तारांबळ उडाली.

यावेळी अम्ब्रिशराव यांनी अभियंता कोतपल्लीवार यांच्याशी फोनवर संपर्क करून वाढीव पाणी पुरवठ्यासंदर्भातल्या अडचणींची माहिती घेतली. तसेच पाणी पुरवठ्याचा आराखडा सादर करायला सांगितले. यावेळी त्यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करुन पालकमत्र्यांकडून निधी आणण्याची ग्वाही दिली. तसेच आता तत्काळ पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले.

यावेळी अम्ब्रिशराव यांनी तिथे तक्रार घेऊन आलेल्या महिलांशी सुध्दा संवाद साधून समस्या जाणुन घेतल्या. दोन वर्षांपासून सतत निवेदने देऊन, घेराव करुनही परिस्थितीत बदल झालेला नाही, उलट समस्या वाढतच असल्याचे यावेळी महिलांनी सांगितले. अभियंता चंद्रपूरला मुक्कामी असतात. दोन-चार महिन्यातून एखादी भेट देत असतात. त्यांना विचारणा केल्यास सबबी सांगून वेळ मारुन नेली जाते. कधी वाढलेले कनेक्शन तर कधी वीज पुरवठ्याची अडचण अशी वेगवेगळी कारणे पुढे करुन हतबलता दर्शवितात. त्यामुळे अहेरीतील पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाल्याचे नागरिकांनी सांगितले.