गडचिरोली : आधुनिक तंत्रज्ञानात गोवंशांची संख्या झपाट्याने कमी होत असली तरी त्याचे महत्त्व कमी झालेले नाही. गाईच्या दुधापासून तर गोमूत्र आणि शेणापर्यंत सर्वच गोष्टींचे मानवी जीवनात अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे गोवंशाचे संरक्षण आणि संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी ठरते, असे प्रतिपादन गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी केले. ब्रह्मपुरी तालुक्यातील हळदा येथे उभारण्यात आलेल्या गोविंद गोशाळा (गोनिवास )शेडच्या लोकार्पणप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
विदर्भ प्रांत संघचालक दीपकराव तामशेट्टीवर यांच्या अध्यक्षतेखाली व मुंबई गो-आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्या हस्ते झालेल्या या कार्यक्रमाला माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांची प्रमुख उपस्थिती होती. दिनदयाल बहुउद्देशीय सेवा संस्थेद्वारा संचालित गोविंद गोशाळा हळदा येथे गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेअंतर्गत गोनिवास शेडचे बांधकाम करण्यात आले. त्याचा लोकार्पण सोहळा दिनांक १९ डिसेंबरला झाला.
यावेळी रा.स्वं.संघाचे ब्रम्हपुरी/चंद्रपूर विभाग संघचालक जयंत खरवडे, भारतीय जीवजंतू कल्याण बोर्डाचे सदस्य सुनील मानसिंहका, महाराष्ट्र शासन गोसेवा आयोगाचे सदस्य सुनील सूर्यवंशी, सदस्य सनत गुप्ता, विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रदेश मंत्री प्रशांत तितरे यांच्यासह चंद्रपूर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.मंगेश काळे, जिल्हा पशुसंरक्षक अधिकारी उमेश हिरुडकर, हळदाचे सरपंच दौलत गरमळे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना खा.अशोक नेते म्हणाले, हिंदू धर्मात गाय ही केवळ एक प्राणी म्हणून नाही, तर तिचे महत्व आईसारखे आहे, म्हणून तिला गोमाता म्हटले जाते. गोवंशाचे संवर्धन, संरक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी असून ही काळाची गरज आहे. गाईचे दूध, शेण, गोमूत्र पवित्रच नाही तर त्यातील औषधी गुणधर्मामुळे मनुष्याचे जीवन आरोग्यदायी ठरते. परंतु अनेक शेतकऱ्यांना परिस्थितीमुळे आपल्या गाई कसायांना विकाव्या लागतात. कोणत्याही शेतकऱ्यांनी आपल्या गाई कसायाला न देता गोशाळेमध्ये त्या द्याव्यात, असे आवाहन यावेळी खासदार अशोक नेते यांनी केले.