गडचिरोली : इतर कोणत्याही जिल्ह्यांपेक्षा गडचिरोलीचे जिल्हाधिकारी असो की पोलिस अधीक्षक, हे अधिकारी जास्तच व्यस्त असतात. दैनंदिन कामाच्या गराड्यात अधिकाऱ्यांसोबत त्यांच्या अधिपत्याखालील कर्मचारीही व्यस्त असतात. पण दिवाळीच्या निमित्ताने आलेल्या सलग पाच दिवसांच्या सुट्यांमुळे काहीसे रिलॅक्स झालेल्या या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी चक्क क्रिकेटच्या मैदानावर उतरून एकमेकांविरूद्ध मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना खेळला. यात महसूल विभागाच्या संघाचे नेतृत्व जिल्हाधिकारी संजय मीना यांनी, तर पोलिस विभागाच्या संघाचे नेतृत्व पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले.
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात विकासात्मक कामांसाठी महसूल आणि पोलिस विभाग एकमेकांच्या हातात हात घालून परिश्रम घेत असतात. या दोन्ही विभागात अधिक समन्वय येऊन विकासकामे प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेतून या क्रिकेट सामन्याचे आयोजन शनिवारी सकाळी 9 वाजता पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर केले होते.
विशेष म्हणजे हा क्रिकेट सामना अधिक पारदर्शक व्हावा यासाठी नागपूर येथील व्हिसीए मैदानावर कार्यरत असलेले प्रशिक्षक व पंच यांना बोलविण्यात आले होते.
नाणेफेकीनंतर असा जिंकला सामना
सुरुवातीला नाणेफेक जिंकत गडचिरोली पोलिस विभागाचे कर्णधार नीलोत्पल यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार संजय मीना यांच्या नेतृत्वात महसूल विभागाकडून प्रथम फलंदाजी करत गौरव नहावृते यांच्या अर्धशतकीय 56 धावांच्या खेळीच्या मदतीने महसूल संघाने 15 षटकांमध्ये 104 धावसंख्या उभारली. यानंतर जिंकण्यासाठी लागणाऱ्या 105 धावांचा पाठलाग करताना नीलोत्पल यांच्या नेतृत्वातील पोलीस संघाने मयुर भुजबळ, कुंदन गावडे, किशोर शिंदे यांच्या फलंदाजीच्या जोरावर 14 व्या षटकात विजय प्राप्त केला. योगायोग म्हणजे कर्णधार संजय मीना यांची कॅच कर्णधार नीलोत्पल यांनी घेतली. त्यानंतर फलंदाजी करताना नीलोत्पल यांनी मीना यांच्याच चेंडूवर चौकार मारून संघाला विजयश्री मिळवून दिली. तेव्हा विजयी संघाने एकच जल्लोष केला.
महसूल संघाचे नहावृत्ते सामनावीर
या रोमांचक क्रिकेट सामन्यात 56 धावा करीत उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन करणाऱ्या महसूल संघाच्या गौरव नहावृते यांना सामनावीराचा पुरस्कार देऊन जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यानंतर विजेत्या व उपविजेत्या संघातील सर्व खेडाळूंना मेडल व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते चषक वितरीत करण्यात आला. सदर सामन्यादरम्यान उपस्थितांकरीता अल्पोपहार, चहापाण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
कोण-कोण होते उपस्थित?
या मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्याचा आनंद घेण्यासाठी अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी मयुर भुजबळ व साहिल झरकर, गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी विवेक साळुंखे, गडचि?रोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुर्यकांत पिदुरकर, गडचिरोलीचे तालुका क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे, व्हिसीए स्टेडीयम नागपूर येथील स्टेट पॅनल पंच आशिष बावनकुळे, लेवल ओ कोच प्रशांत भुपाल व सचिन मडावी, सेवानिवृत्त क्रीडा अधिकारी मदन टापरे यांच्यासह पत्रकार प्रामुख्याने उपस्थित होते.
“गडचिरोली जिल्ह्राच्या विकासासाठी महसूल विभाग आणि पोलिस विभाग हे नक्षलग्रस्त, अतिदुर्गम भागात आपले कर्तव्य पार पाडत असतात. याकरीता दोन्ही विभागांमध्ये अधिक समन्वय रहावा यासाठी या मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. विजयी संघाचे अभिनंदन, दोन्ही संघाने अतिशय चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. आम्ही अधिक धावसंख्या उभारण्याची आवश्यकता होती. सामना हारणे किंवा जिंकणे हे महत्वाचे नसून सामना कसा खेळला हे महत्वाचे आहे.”
– संजय मीना, जिल्हाधिकारी