गडचिरोली : विद्यार्थ्यांचे आंतरवर्गीय, आंतरशालेय किंवा मुला-मुलींच्या संघांमध्ये होणारे मैदानी सामने अनेक वेळा पहायला मिळतात. पण येथील प्लॅटिनम स्कूल आणि ज्युनिअर कॅालेजमध्ये जागतिक बालकदिनाचे औचित्य साधून सोमवारी (दि.२०) चक्क विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात क्रिकेट सामना रंगला. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही या सामन्याचा मनमुराद आनंद लुटला.
बालकदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. संगीत खुर्ची, खो-खो, क्रिकेट या खेळांच्या आयोजनासह शिक्षकांकडून विशेष परिपाठ घेण्यात आला. पण सर्वाधिक आकर्षण होते ते विद्यार्थी आणि शिक्षकांमधील क्रिकेट सामन्याचे. शिक्षकांनी नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. त्यात तुषार कांबळे आणि निकेशन देऊरमले यांनी तर विद्यार्थ्यांकडून पुष्कर चौधरी आणि उत्कर्ष यांनी डावाची सुरूवात केली. शिक्षकांनी हा सामना जिंकला असला तरी विद्यार्थ्यांनी जिंकण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे संस्थेचे महासचिव अजिझ नाथानी यांनी कौतुक केले. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आवडीनुसार कोणत्या ना कोणत्या खेळात सहभाग घ्यावा, असा सल्ला त्यांनी दिला.
यावेळी मुख्याध्यापिका अनैता चार्ल्स यांच्यासह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.