– तर वनमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन, काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी दिला इशारा

काय आहे मागणी? पूर्तता होणार का?

गडचिरोली : जिल्ह्यात मागील दिड वर्षांपासून रानटी हत्तींचा वावर वाढलेला आहे. या हत्तींनी जिल्ह्यातील अनेक गावातील घरे आणि शेतीचे नुकसान केले आहे. त्यामुळे या रानटी हत्तींचा दोन दिवसात बंदोबस्त करा, अन्यथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलनाला बसण्याचा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिला आहे. दरम्यान आतापर्यंतची परिस्थिती पाहता त्यांच्या या मागणीची पूर्तता करणे वनविभागाला शक्य होईल का, याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

शेतीवर पूर्णतः अवलंबून असलेल्या या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाची शेती केली जाते. आता धानपीक कापणीवर आले आहे. अनेक ठिकाणी कापणी होऊन पूजनेही रचण्यात आले आहे. अशा भागात जंगली हत्तींचा धुमाकूळ वाढला आहे. ऐन पीक हाती आले असताना शेतकऱ्यांना अश्या प्रकारचे नुकसान होणे म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिसकावणे आहे. या रानटी हत्तींचा व वाघांचा बंदोबस्त करा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या जाचक अटी न ठेवता सरसकट सढळ हाताने मदत करा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

या मागणीसाठी यापूर्वी काँग्रेसने आंदोलनही केले आहे. मात्र वनविभाग, जिल्हा प्रशासन, पालकमंत्री आणि वनमंत्री निद्रावस्थेत असल्याप्रमाणे वागत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या रानटी हत्तींचा बंदोबस्त न झाल्यास गडचिरोली जिल्हा काँग्रेसच्या वतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन वनमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिला आहे.