गडचिरोली : येणाऱ्या खरीप हंगामासाठी आवश्यक खर्चाच्या रक्कमेसाठी जिल्ह्यातील धान, कापूस, मका उत्पादक शेतकऱ्यांनी जवळच्या संबंधित बँक शाखांमध्ये पीक कर्जासाठी तातडीने अर्ज करुन आवश्यक रक्कम रोवणीपुर्वीच प्राप्त करावी, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा शाखेने शेतकऱ्यांना केले आहे.
शेतकरी कामगार पक्षातर्फे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्ह्यातील धान, कापूस, सोयाबीन, मका उत्पादक शेतकऱ्यांना शेतीची मशागत आणि पेरणीकरीता आर्थिक मदतीची गरज असते. सध्या पेरणीपूर्व शेती मशागतीच्या कामात शेतकरी गुंतले आहेत. त्यामुळे आवश्यक पीक कर्जासाठी अर्ज करण्याकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होते. जुलै, ऑगस्ट मध्ये शेतकऱ्यांना जेव्हा रोवणीसाठी पैशांची गरज असते तेव्हा बॅँकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक होवून मोठा त्रास सहन करावा लागतो. सरकारच्या जनहिताच्या धोरणानंतरही असे होवू नये अशी अपेक्षा असते. मात्र वेळेवर पीक कर्जाची रक्कम न मिळाल्याने रोवणीच्या कामात अडथळे निर्माण होवून शेतकरी नागवला जातो. हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी जून महिन्यातच पीक कर्जाची रक्कम मिळवण्यासाठी तातडीने अर्ज करुन धान रोवणीपुर्वीच पीक कर्जाची रक्कम प्राप्त करून पुढील नियोजन करावे.
तसेच पीक कर्जाची रक्कम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांची तक्रार शेतकरी कामगार पक्षाकडे करावी, असेही आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस रामदास जराते, जिल्हा खजिनदार शामसुंदर उराडे, महिला नेत्या जयश्री वेळदा, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अक्षय कोसनकर, तुकाराम गेडाम, अशोक किरंगे, दामोदर रोहनकर, सुधाकर आभारे, रमेश चौखुंडे, डाॅ.गुरुदास सेमस्कर, चंद्रकांत भोयर, गंगाधर बोमनवार, प्रदीप आभारे, बाजीराव आत्राम, तुळशीदास भैसारे, देवेंद्र भोयर यांनी केले आहे.