सामाजिक द्वेषातून युवकाची हत्या करणाऱ्यांना तात्काळ फाशीची शिक्षा द्या!

समता सैनिक दल व सामाजिक संघटनेकडून निवेदन

अहेरी : एप्रिल महिन्यात भीम जयंतीनिमित्त भीम रॅली काढल्याचा राग मनात ठेऊन 1 जून रोजी काही समाज कंटकांनी नांदेड शहरालगतच्या बोंडार या गावी अक्षय भालेराव या युवकाची निर्घृणपणे हत्या केली. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून संबंधित आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी या प्रमुख मागणीसह इतर १२ मागण्यांचे निवेदन समता सैनिक दल शाखा अहेरी आणि सामाजिक संघटनेच्या वतीने अपर जिल्हाधिकारी अहेरी यांच्यामार्फत राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे पाठविण्यात आले.

या प्रकरणातील हल्लेखोरांनी मृत अक्षयची आई व भावावरही प्राणघातक हल्ला करून वस्तीत धुडगुस घातला. अशा पद्धतीने दहशत पसरविले ही राज्याला कलंकित करणारी आणि मानव जातीला काळीमा फासणारी घटना असून तात्काळ हल्लेखोरांना जेरबंद करून जाहीर फाशीची शिक्षा ठोठावण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. तसेच आरोपींची संपत्ती जप्त करावी, प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे, कुटुंबाला आर्थिक मदत करून घरच्या सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी, पीड़ित कुटुंबियांच्या जीविताला धोका असल्याने पोलीस संरक्षण द्यावे, गावात पोलीस चौकी उभारण्यात यावी अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या.

निवेदन देताना अॅड. पंकज दहागावकर, सुरेंद्र अलोणे, धर्मपाल डुरके, प्रणय अलोणे, नभित ढोलगे, राहुल गर्गम, प्रिया दुर्गे, सारिका ओंडरे, विनीत गोवर्धन, आकांक्षा दहागावकर, जागृती चालूरकर, दीक्षा कुंभारे, प्रकर्षा गव्हारे यांच्यासह अनेक युवक-युवती उपस्थित होते.