भामरागड : दुर्गम-अतिदुर्गम भागात नक्षलविरोधी अभियानासाठी कार्यरत असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाकडून नागरी कृती कार्यक्रमांतर्गत नागरिकांना विविध प्रकारची मदत दिली जात आहे. त्याअंतर्गत भामरागड येथील एफ-37 बटालियनच्या वतीने स्थानिक नागरिकांना मधमाशी पालनाचे प्रशिक्षण देऊन त्यांना मधमाशी पालनासाठी पेटी व इतर साहित्य भेट देण्यात आले.
कंपनी कमांडर एच.आर.मीना यांच्या हस्ते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते, पोलीस ठाण्याचे प्रभारी दीपक डोम यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
तत्पूर्वी स्थानिक नागरिकांना मधमाशी पालनाच्या व्यवसायासाठी प्रोत्साहन म्हणून पाच दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. त्या प्रशिक्षणाचे उद्घाटन कमांडंट दव इंजिरकन किंडो यांच्या हस्ते करण्यात आले. स्थानिक नागरिकांना स्वयंरोजगारातून उत्पन्नाचे नवीन साधन उपलब्ध व्हावे आणि मधमाशी पालनाद्वारे पर्यावरण संरक्षणाला चालना मिळावी, नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले.