गडचिरोली : भामरागड तालुक्यातील लाहेरी पोलीस स्टेशनअंतर्गत एका गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत तिसऱ्या आणि पाचव्या वर्गाच्या विद्यार्थिनींशी लैंगिक चाळे करणाऱ्या मुख्याध्यापकाला तडकाफडकी निलंबित करण्यात आले. गुरूवारी सर्वप्रथम ‘कटाक्ष’ने या प्रकरणाची बातमी प्रकाशित केली. ती व्हायरल होताच सर्वत्र खळबळ उडाली. जि.प.चे सीईओ सुहास गाडे यांनी या गंभीर प्रकाराबद्दल मुख्याध्यापक रविंद्र गव्हारे याला तातडीने निलंबित करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार गुरूवारीच ही कारवाई करण्यात आली.
मुख्याध्यापक गव्हारे यांनी केलेला हा प्रकार गंभीर असल्यामुळे तत्काळ त्यांचे निलंबन करण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी पवार यांनी सांगितले. यासोबत त्यांची विभागीय चौकशीही करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.
मुख्याध्यापक गव्हारे हा मुलींना रजिस्टर घेऊन येण्याच्या बहाण्याने आपल्या कक्षात बोलवायचा आणि त्यांच्याशी लैंगिक चाळे करायचा. मुलींना शाळेतून काढून टाकण्याची आणि मारण्याची धमकी देऊन गप्प केले जात होते. यामुळे घाबरलेल्या मुलींनी या प्रकरणाची पालकांकडे वाच्यता केल्यानंतर एका महिला पालकाने पोलिसात धाव घेतली. त्यानंतर एसडीपीओ अमर मोहिते यांच्या नेतृत्वात पोलीस विभागाने त्या मुख्याध्यापकाविरूद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. एका शिक्षकी पेशातील व्यक्तीने आपल्या मुलीच्या वयाएवढ्या विद्यार्थिनींशी असा अश्लील प्रकार केल्याबद्दल सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.