देवरी : भारतीय जनता पक्ष व युवा मोर्चाच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शनिवारी (दि.९) दहीहंडी स्पर्धेचे आयोजन देवरी येथील जि.प. पटांगणात केले होते. या कार्यक्रमाला खासदार अशोक नेते यांची प्रमुख उपस्थिती होती. हा साहसी खेळ सांघिक यशाची शिकवण देणारा आहे. पण हा खेळ तितकाच जोखमीचा असल्यामुळे सावधगिरी बाळगून खेळा, असा सल्ला खासदार तथा भाजप अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी दिला.
श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाच्या शुभेच्छा देत खा.नेते यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहाने, आनंदाने, बालगोपाल, युवक मोठया संख्येने या उत्सवात सहभागी होतात. पण हा खेळ इतर खेळांपेक्षा वेगळा आहे. एकमेकांच्या सहाय्याने हा खेळ खेळताना पाण्याचा वर्षाव केला जातो. सांघिकपणे एकमेकांना साथ दिल्यास संकटांना झेलत यशाच्या दहीहंडीपर्यंत पोहोचणे शक्य होते, हेच यातून दिसते, असे मार्गदर्शन खा.अशोक नेते यांनी केले.
यावेळी दहीहंडी स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकाला स्मृतिचिन्ह व बक्षिसाची रोख रक्कम देऊन अभिनंदन करण्यात आले. गोविंदा-गोविंदा, गणपती बाप्पा मोरया, असे जयघोष करत आनंद साजरा करण्यात आला.
याप्रसंगी माजी आमदार संजय पुराम, देवरी भाजपचे तालुकाध्यक्ष अनिल येरणे, देवरीचे नगराध्यक्ष संजय उइके, गोंदिया जि.प.च्या महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम, कृ.उ.बा.स. सभापती प्रमोद संगीडवार, देवरी पंचायत समितीच्या उपसभापती अम्बिका बंजार, उपनगराध्यक्ष प्रज्ञा संगीडवार, उपसभापती अनिल बिसेन, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष छोटू भाटीया, महामंत्री नितेश कुमार वालोदे, महामंत्री प्रवीण दहीकर, राजू शाहू, भाजपच्या महिला कार्यकर्त्या सरिता डूंबरे, नगरसेविका कौशल्या कुमरे, देवरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार डांगे, तसेच देवरी श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीचे सदस्य तथा युवक वर्ग, बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.