अन् अपघातग्रस्त दुचाकीस्वार युवकाच्या मदतीला धावून आल्या भाग्यश्री आत्राम

गाडीत घेऊन दाखल केले रुग्णालयात

सिरोंचा : अपघातग्रस्तांना सर्वात आधी वैद्यकीय उपचार देण्यासाठी मदत करा, असे आवाहन शासन आणि प्रशासनाच्या वतीने करण्यात येते. अनेक जण ती मदत करतही असतात. पण शनिवारी माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्यासारख्या महिला नेत्याने एका अपघातग्रस्त युवक व त्याच्या मुलीच्या मदतीसाठी धावून जाऊन त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करत एक आदर्श निर्माण केला.

माजी जि. प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम शनिवारी सिरोंचा तालुक्यातील अंकिसा दौरा करून सिरोंचाकडे परत येत होत्या. वडधम गावापासून पुढे 5 किलोमीटर अंतरावर एका दुचाकीस्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. सदर व्यक्ती रक्तबंबाळ होऊन पडलेला होता. त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या 13 वर्षीय मुलीला सुदैवाने कुठेही फारसी दुखापत झाली नव्हती. मात्र वडील अपघातात गंभीर जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत पडल्याने ती भर रस्त्यावर रडत होती.

हे दृश्य बघून तात्काळ भाग्यश्री आत्राम यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मदतीने जखमी युवकाला आणि त्याच्या मुलीला वाहनात घेऊन थेट सिरोंचा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रमेश दुर्गय्या तोंगा (30) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सध्या त्याच्यावर सिरोंचा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने अनर्थ टळला असला तरी डोक्याला जबर मार असल्याचे सांगण्यात येत आहे.

या मदतीमुळे अपघातग्रस्त तोंगा कुटुंबीयांनी भाग्यश्री आत्राम यांचे आभार मानले आहे. अपघातग्रस्त व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिरोंचा तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लूरी, वेंकटलक्ष्मी आरवेली, जगदीश रालाबंडीवार, रवी सुलतान, एम डी शानू, सार्थक आत्राम, श्रीकांत गुरनूले आदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मदत केली.