गडचिरोली : शहरातील अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ शाखा रामनगर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 56 व्या पुण्यतिथी महोत्सवाचा समारोपीय कार्यक्रम अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने आयोजित केला होता. यावेळी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी यांनी मार्गदर्शन करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगितेत सांगितलेले आचारविचार घराघरांत पोहोचवण्याचे आवाहन केले.
पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने रामनगर शाखेत रांगोळी, परिसर स्वच्छता, ध्यान आणि प्रार्थनेचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या महोत्सवाचा समारोप होत असला, तरी चांगल्या कार्यक्रमाचा खरा शेवट चिंतन, मनन आणि कृतीतून विचार आत्मसात केल्यावरच होतो. त्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार कृतीत आणणे गरजेचे आहे. अशा प्रकारचे कार्यक्रम आचार-विचारांची देवाणघेवाण साधत मन प्रसन्न ठेवण्यास उपयुक्त ठरतात, असे मा.खा.नेते म्हणाले.
या पुण्यतिथी महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात सामुदायिक प्रार्थना आणि ध्यानाचा कार्यक्रम झाला. यावेळी नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्तींचा माजी खासदार अशोक नेते आणि आ.डॉ.मिलिंद नरोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पुण्यतिथी महोत्सवात मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला गडचिरोलीचे नवनिर्वाचित आमदार डॉ.मिलिंद नरोटे, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, जेष्ठ नेते प्रमोद पिपरे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गिता हिंगे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर भडांगे, भाजपच्या जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, विठ्ठलराव गेडाम, चरणदास बोरकुटे, मधुकरराव भोयर, कवडू येरमे, राजेंद्र भरडकर, रामकृष्ण ताजने, सुरेश मांडवगडे, संजय बर्वे, नामदेव शेंडे यांच्यासह शहरातील ज्येष्ठ नागरिक, बंधू-भगिनी आणि गुरुदेव भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
गडचिरोली शहरात भव्य दिंडीचे आयोजन
गडचिरोली शहरात दिंडी काढून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची प्रतिमा साकारण्यात आली. गुरुदेव भक्त, महिलावर्ग, युवक-युवती, आणि बालगोपालांनी मोठ्या संख्येने यात सहभाग घेतला. प्रवचनांमुळे शहराचे वातावरण भक्तिमय झाले होते.