गडचिरोली जिल्ह्यातील डीपी प्लॅनमध्ये लाखोंच्या उलाढालीतून मोठी गडबड

प्लॅन रद्द करा,अन्यथा उपोषण-शेडमाके

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत क्षेत्राकरिता डीपी प्लॅन तयार करताना ग्रीन झोनला येलो झोनमध्ये रूपांतरित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याने या प्लॅनला मंजुरी न देता तो रद्द करावा, अशी मागणी काँग्रेसच्या आदिवासी आघाडीचे प्रदेश सचिव छगन शेडमाके यांनी केली आहे.

यासंदर्भात शेडमाके यांनी बुधवारी विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांची त्यांच्या शासकीय बंगल्यावर भेट घेतली. यावेळी वाढदिवसानिमित्त त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देत शेडमाके यांनी निवेदन सादर केले. त्यांच्या म्हणण्यांनुसार, सासऱ्याच्या हत्या प्रकरणातील आरोपी आणि गडचिरोलीत भूमी अभिलेख विभागाची सहायक संचालक असलेल्या अर्चना पुट्टेवार यांच्या कार्यकाळात तयार केलेल्या डीपी प्लॅनमध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रीन झोनची जमीन येलो झोनमध्ये रूपांतरित करण्याचे प्रस्ताव सादर करण्यात आले. यात देसाईगंज, कुरखेडा, कोरची, आरमोरीसह गडचिरोली आणि जिल्ह्यातील इतर नगर पंचायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात ग्रीन झोनच्या जमिनीला येलो झोनमध्ये रूपांतरित करण्याचे प्रस्ताव पुट्टेवार यांनी अंतिम मंजुरीसाठी पुणे येथील राज्य पातळीवरील कार्यालयाकडे सादर केले. पण त्या प्रस्तावांना वरिष्ठांनी अद्याप मंजुरी दिलेली नाही. वास्तविक या प्रस्तावांमध्ये नियमांना धाब्यावर बसवून कोट्यवधी रुपयांचे गैरव्यवहार करण्यात आले. पर्यावरण संतुलनाचा किंवा नागरिकांच्या सुविधांचा विचार न करता केवळ पैसे कमवण्यासाठी बनविलेले हे डीपी प्लॅन रद्द करून या कामांची चौकशी करावी आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशीही मागणी छगन शेडमाके यांनी केली आहे. या नियमबाह्य कामांना मंजुरी दिल्यास उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

पैशाच्या हव्यासापोटी स्वत:च्या सासऱ्याची हत्या केल्याचा आरोप असलेल्या अर्चना पुट्टेवार यांनी गडचिरोलीत गैरमार्गाने पैसे कमविल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळातील सर्व कामांची चौकशी करावी आणि त्यांना या कामात साथ देणाऱ्यांवरही कारवाई करावी अशी मागणी शेडमाके यांनी केली आहे.