राष्ट्रीय डेंगू दिवसानिमित्त प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन

श्री साई इन्स्टिट्युट ऑफ नर्सिंगचे आयोजन

गडचिरोली : येथील लिडिंग ऑर्गनायझेशन ऑफ रुरल डेव्हलपमेंटव्दारा संचालीत श्री साई इन्स्टिटयुट ऑफ नर्सिंग अॅन्ड मेडिकल सायन्स येथे 16 मे हा राष्ट्रीय डेंगु दिवस साजरा करण्यात आला. यावेळी तज्ज्ञांनी डेंगू प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर मार्गदर्शन करून प्रात्यक्षिकेही दाखविली.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून पुणे येथील सीएचआरआयच्या मुख्य तंत्र अधिकारी डॉ.नेहा वाघ आणि राहुल राठोड, तसेच आरोग्य विभागाचे किटकशास्रज्ञ डॉ.संजय कार्लेकर आणि आरोग्य विभागाचे क्रिष्णा अवधुत प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री साई इन्स्टिट्युट ऑफ नर्सिंग अॅन्ड मेडिकल सायन्सचे प्राचार्य उत्तम खते होते. यावेळी जीएनएमच्या प्राचार्य नेहा ओलख आणि जीएनएम प्रथम व व्दितीय वर्षाचे तथा बी.एससी. प्रथम व व्दितीय वर्षाचे विद्यार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते.

डेंगूपासून संरक्षण करण्याकरीता करण्यात येणारे विविध उपाय, डेंगू पसरवणाऱ्या एडिस इजिप्ती प्रजातीच्या डासांची निर्मिती कशी होते, पाण्याची भांडी वारंवार रिकामी करणे, कोरडा दिवस पाळून डेंगूच्या डासांच्या निर्मितीला आळा घालणे, डेंगूचा डास ओळखणे अशा अनेक मुद्द्यांवर यावेळी प्रात्याक्षिकासह डॉ.संजय कार्लेकर यांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी डॅा.नेहा वाघ यांनी गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा-अहेरी तालुक्यातील अंकिसा, देलचीपेठा, कमलापूर, असरअल्ली, जाफ्राबाद, किष्टयापल्ली या भागात डेंगुचे गतवर्षी 250 पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले असल्याने डेंगुच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचाराबाबत घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले.