चामोर्शीतील तलाठी, मंडळ अधिकारी कार्यालयाला उद्घाटनाआधीच अवकळा

कोट्यवधीचा खर्च बिनकामाचा ठरणार?

चामोर्शी : सर्वसामान्य नागरिकांशी संबंधित महसूल विभागाच्या कामांचा निपटारा मंडळस्तरावर व्हावा यासाठी तलाठी साझा, मंडळस्तरावर राज्य शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून तलाठी कार्यालय व मंडळ अधिकारी अधिकारी कार्यालयासह त्यांची निवासस्थानेही बांधली. परंतु चामोर्शी येथील सदर इमारत महसूल विभागाकडे हस्तांतरित होण्याआधीच जीर्णावस्थेकडे वाटचाल करीत आहे. त्या इमारतीला अवकळा आली आहे.

या इमारतीला झुडूपाने वेढा घातला असून ही इमारत ओसाड पडली आहे. या स्थितीमुळे राज्य शासनाच्या या इमारत उभारणीमागील उद्देशाला हरताळ फासल्या गेला आहे. सर्वसामान्य, गोरगरीब नागरिकांना मंडळस्तरावरच सर्व सोयीसुविधा मिळाव्या, वेळेवर तलाठी व मंडळ अधिकारी उपलब्ध व्हावेत यासाठी त्यांच्या निवासस्थानांचेही बांधकाम केले आहे. परंतु सदर बांधकाम दिवसेंदिवस जीर्णावस्थेकडे वाटचाल करत आहे.

सदर सर्व तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाची इमारत तात्काळ बांधकाम विभागाने महसूल विभागाकडे हस्तांतरीत करून हे कार्यालय लवकर कार्यान्वित व्हावे, अशी मागणी भाजपच्या सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा चामोर्शीचे नगरसेवक आशिष पिपरे आणि भाजपचे चामोर्शी शहर महामंत्री रमेश अधिकारी यांनी केले आहे.