– नक्षलवाद वैचारिक नव्हे, तर देशविरोधी लढाई : उपमुख्यमंत्री फडणवीस
– दामरंचा, ग्यारापत्ती, गट्टा येथील पोलिस स्थानकाच्या इमारतींचे उद्घाटन
गडचिरोली : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सलग दोन दिवस गडचिरोली जिल्ह्याला वेळ देऊन विविध कार्यक्रमांना उपस्थिती दर्शविली. ज्या ठिकाणी ३० एप्रिलला तीन नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आले, त्यानजीक असलेल्या दामरंचा आणि तसेच थेट छत्तीसगडच्या सीमेवर जाऊन देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांशी संवाद साधला. सी-60 जवानांचा गणवेश परिधान करुन एकप्रकारे मीही तुमच्यापैकीच एक आहे आणि तुमच्यासोबत आहे, असा संदेश उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. नक्षलवाद ही विचारांची नाही, तर आता देशविरोधी लढाई आहे. लोकशाही आणि संविधान न मानणार्यांची ती लढाई आहे, असे उपमुख्यमंत्री संध्याकाळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
सायंकाळी पोलीस मुख्यालयात झालेल्या पोलीस अधिकारी आणि सी-60 पथकातील जवानांच्या सत्कार कार्यक्रमाला खासदार अशोक नेते, आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती दल) प्रविण साळुंके, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटिल, जिल्हाधिकारी संजय मिणा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) यतिश देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
जेव्हा स्थानिक स्तरावर नक्षलवाद्यांना यश मिळत नाही, तेव्हा ते लोकांचे ब्रेनवॉश करुन ही लढाई शहरांमध्ये लढू पाहताहेत. लोकशाही आणि संविधान न मानणे, हेच त्यांचे काम आहे. ही अराजकता आहे. गेल्या कालावधीत असेच एक मोठे नेटवर्क ध्वस्त करण्याचे काम आम्ही केले होते, असेही फडणवीस यावेळी म्हणाले. गडचिरोलीत कनेक्टिव्हीटी वाढविण्याचे काम मोठ्या प्रमाणात होत आहे. सुजरागडच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक येते आहे, असेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी दामरंचा आणि नंतर ग्यारापत्ती या दोन्ही ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलिस इमारतींचे उद्घाटन करण्यात आले. आपले जवान धोका पत्करुन काम करतात. त्यांचे मनोबल वाढविणे आणि नागरिकांशी संवाद साधणे, हाच या दौऱ्यामागचा उद्देश असल्याचे ना.फडणवीस म्हणाले.
नागरिकांनी मांडल्या विविध समस्या
अतिसंवेदनशील भागात साधारणत: कुणी भेटत नाही. तेथे खुद्द उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरिकांशी व्यक्तिगतरित्या संवाद साधला. एसटीचा अर्ध्या तिकिटात प्रवास, शेतीच्या कोणकोणत्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचतात, असे प्रश्न त्यांनी महिला, पुरुषांना विचारले आणि शासकीय योजनांबाबत त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. काही महिलांनी सध्या केवळ सकाळी आणि सायंकाळीच बस येते, दुपारी बस सुरु करा, अशी मागणी केली. त्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले. त्याचवेळी महिलांना अर्धे तिकिट आणि लेक लाडकी या यो ooजनांचे महिलांनी स्वागत सुद्धा केले.