गडचिरोली : राज्याच्या पोलिस महासंचालक म्हणून पदभार घेतल्यानंतर रश्मी शुक्ला यांनी अवघ्या दोन आठवड्यात दुसऱ्यांदा गुरूवारी (दि.29) गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. त्यांनी अतिसंवेदनशील मन्नेराजाराम आणि भामरागड पोलिस स्टेशनला भेट देऊन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेथील कामकाज आणि तयारीची पाहणी केली. यावेळी भामरागड येथे पोलिसांच्या पुढाकाराने आयोजित कृषी मेळाव्यात त्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थी आणि नागरिकांसोबतही त्यांनी संवाद साधला.
पोलिसांकडून काढल्या जात असलेल्या दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या बाराव्या कृषीदर्शन सहल आणि अभ्यास दौऱ्यासाठी जाणाऱ्या बसला शुक्ला यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन यांच्यासह पोलिस महानिरीक्षक (नक्षल अभियान) संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, तसेच केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या 191 बटालियनचे कमांडंट एम.एस.खोब्रागडे, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी (भामरागड) अमर मोहिते आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
या भेटीदरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मन्नेराजाराम येथील जवानांची शुक्ला यांनी ‘स्टॅण्ड टू ड्रील’ घेतली, तसेच पोस्टेच्या कामकाजाची पाहणी करुन उपस्थित अधिकारी आणि अंमलदार, तसेच लहान मुले व नागरीकांसोबत संवाद साधला. पोलिस जवानांसोबत नाश्ता करुन त्यांनी जवानांचे मनोबल वाढविले.
शेतकऱ्यांनी विविध तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती करावी, पोलिस दलाच्या विविध उपक्रमांचा लाभ घेवुन आपले जीवनमान उंचवावे यासाठी भामरागड येथे पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आयोजित कृषी मेळाव्यात नागरिकांना फळझाडांच्या रोपांचे वाटप करण्यात आले. त्यात आंबा-40, चिक्कू-40 सीताफळ-40, फणस- 40, लिंबू-40 इ.रोपांचे तसेच शेतकयांना कृषी उपयोगी अवजारे (सब्बल, कृषी स्प्रे-पंप, घमेले) इ. साहित्यांचे वाटप करण्यात आले.