विकास कामांच्या नावाखाली निधी लाटण्याचा सपाटा – ॲड.सुरेश माने

कोटगल बॅरेजला भेट दिल्यानंतर केला आरोप

गडचिरोली : जिल्ह्यात विकासाच्या नावाखाली शेकडो कोटींच्या प्रकल्पांचे काम सुरू करण्यात आले आहे. ही विकासकामे करताना येथील जनतेच्या हिताला प्राधान्य न देता सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांना निधी कसा पदरात पाडून घेता येईल याकडे जास्त लक्ष दिल्या गेले. जनतेच्या हक्काच्या पैशांची वासलात लावण्याचे काम केले जात असल्याचा आरोप बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ॲड.सुरेश माने यांनी केला आहे.

गडचिरोली येथे आयोजित आंबेडकरी कार्यकर्ता महामेळाव्यानिमित्त आले असता ॲड.माने यांनी कोटगल बॅरेज, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्टेडियमला भेटी देवून पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस रामदास जराते, बीआरएसपीचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष विशेष फुटाणे, जिल्हा प्रभारी राज बन्सोड, जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे, अक्षय कोसनकर, हेमंत डोर्लीकर उपस्थित होते.

कोटगल बॅरेज हा ३६५ कोटींचा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आला आहे. त्याकरिता बुडीत क्षेत्र म्हणून २५५ हेक्टर शेतजमीन संपादित करण्यात आली. या प्रकल्पातून ६६२० हेक्टर शेतीकरिता लाभ होणार आहे. मात्र सध्या या बॅरेजच्या लाभक्षेत्रातील शेतजमिनी विमानतळ, विद्यापीठ इत्यादी कामांसाठी गैरपध्दतीने संपादीत करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून केल्या जात आहेत. चुकीच्या नियोजनामुळे भविष्यात संपूर्ण गडचिरोली शहराला पुरबुडीचा धोका निर्माण होण्याची भिती त्यांनी व्यक्त केली.

जिल्हा स्टेडियम आणि शासकीय रुग्णालयामध्येही बांधकामाचा मोठा सावळागोंधळ सुरू आहे. निकृष्ट दर्जाची आणि नियोजनशून्य कामे करुन जनतेच्या हक्काच्या पैशांचा सत्ताधाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे खिसे भरण्यासाठी केली जात असल्याने गडचिरोलीत बोगस विकासाच्या विरोधात बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षातर्फे आंदोलनात्मक आणि न्यायालयीन लढाई उभी करण्याचा इशारा ॲड.सुरेश माने यांनी दिला.