सिरोंचा / भामरागड : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि नागपूरचे हिवाळी अधिवेशन आटोपल्यानंतर आ.धर्मरावबाबा आत्राम 21 डिसेंबरला पहिल्यांदाच आपल्या मतदार संघाच्या दौऱ्यावर निघाले. सलग तीन दिवस त्यांनी सिरोंचा आणि भामरागड तालुक्यात विविध कामांचा धडाका लावला. अनेक ठिकाणी भूमिपूजन करून विविध कामांना सुरूवात तर काही कामांचे लोकार्पण केले. विशेष म्हणजे नागरिकांच्या सुविधेसाठी अग्निशामक बाईक ही नवीन संकल्पना जिल्ह्यात पहिल्यांदाच अंमलात आणत सिरोंचा तालुक्यासाठी ही बाईक धर्मरावबाबांच्या हस्ते देण्यात आली.
धर्मरावबाबा यांनी सर्वप्रथम सिरोंचा तालुक्यातील पर्सेवाडा, नरसिंहपल्ली, तेकडा, जाफराबाद, रेगुंठा परिसरात दौरा करून कार्यकर्त्यांची बैठक घेतली. निवडून आल्यानंतरचा हा पहिलाच दौरा असल्याने कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
विशेष म्हणजे निवडणुकीदरम्यान त्यांनी दिलेला शब्द पाळत येथील कंबालपेठा ते टेकडा रस्त्यावरील मोठ्या पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन केले. त्यानंतर पर्सेवाडा-चिकेला-जाफराबाद रस्त्यावर सरंदान भिंतीच्या बांधकामाचे भूमिपूजन केले. या भागातील शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन बामणी आणि अमरावती येथे खरीप पणन हंगाम 2024-25 अंतर्गत धान खरेदी केंद्रांचा शुभारंभ केला. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
आ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय सिरोंचा येथे तालुक्यातील विभाग प्रमुख तथा कार्यालय प्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी नागरिकांच्या सुविधेसाठी अग्निशामक बुलेट बाईकचे लोकार्पण धर्मरावबाबा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसीलदार निलेश होनमोरे यांच्यासह अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम, सामाजिक कार्यकर्ते तथा राकाँचे जेष्ठ पदाधिकारी बबलू हकीम, सिरोंचा तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी, नगरसेवक जगदीश रालाबंडीवार, नगरसेवक सतीश भोगे, नगरसेवक सतीश राचर्लावार, रामकिष्ठू नीलम, कोंडय्या कटकू, सत्यनारायण परपटला, गोविंद पेद्दी, वेंकटलक्ष्मी अरवेली, मधुकर मडावी, श्रीनिवास चिंतावार, कृष्णमूर्ती रिकुला, लक्ष्मण येरावार, मारन्ना नीलम, सरशील अकनपल्ली, सर्गती नरेश तसेच विविध गावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भामरागड तहसील कार्यालयात बैठक
दि. 24 डिसेंबर रोजी धर्मरावबाबा आत्राम यांनी भामरागड येथे दौरा करत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पक्षवाढीसंदर्भात काम करण्याचे आदेश त्यांनी दिले. यावेळी आदिवासी सेवक डॉ.चरणजितसिंग सलुजा, माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम, तालुकाध्यक्ष रमेश मारगोनवार, तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर तहसील कार्यालयाला भेट देऊन लोकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. अधिकाऱ्यांना त्या समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे निर्देश दिले. यावेळी तहसीलदार किशोर बागडे, माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम, तालुकाध्यक्ष रमेश मारगोनवार, तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.