गडचिरोली : राज्यात महसूल आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टिने महत्वाच्या टप्प्यावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय दैने यांची अचानक नागपूर येथे वस्रोद्योग आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी वस्रोद्योग आयुक्त अविशांत पांडा हे गडचिरोलीचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून गुरूवार, दि.26 रोजी पदभार घेणार आहेत.
दैने यांचा गडचिरोली जिल्ह्यातील कार्यकाळ अवघा 9 महिन्यांचा ठरला आहे. मुख्यमंत्री आणि महसूलमंत्री हे नागपूर जिल्ह्याचे आहेत. त्यामुळे त्यांनी दैने यांना आपल्या गृहजिल्ह्यात घेतले, की गडचिरोलीत त्यांना पांडा हवे होते म्हणून हे बदल करण्यात आले, अशी चर्चा यानिमित्ताने सुरू आहे. गडचिरोलीत उपविभागीय अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळल्यानंतर 20 वर्षांनी जिल्हाधिकारी म्हणून संजय दैने 11 मार्च 2024 रोजी रुजू झाले होते. त्यांच्या कार्यकाळात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक शांतपणे पार पडली. असे असताना त्यांना येथून हलविण्यासाठी सरकारमधील खांदेपालट जबाबदार असल्याचा अंदाज बांधला जात आहे.
नव्याने येणारे अविशांत पांडा हे 2017 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी नंदुरबार येथे प्रकल्प अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आणि अमरावती येथे जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यानंतर ते सध्या नागपूर येथे वस्रोद्योग आयुक्त म्हणून कार्यरत होते.