कंत्राटी शिक्षकांच्या भरतीसाठी 4 व 5 सप्टेंबरला होणार कागदपत्रांची तपासणी

कोणी यावे, कोणी येऊ नये? वाचा

गडचिरोली : जिल्हा परिषद गडचिरोलीअंतर्गत पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये दोन टण्यातील कंत्राटी शिक्षक भरती पूर्ण झाल्यानंतर उर्वरीत रिक्त पदांवर प्राथमिक शिक्षकांची भरती केली जात आहे. अनुसूचित जमाती आणि इतर प्रवर्गाच्या पात्र उमेदवारांकडून यासंदर्भात अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार प्राप्त अर्जांची छाननी करून पात्र व अपात्र उमेदवारांची यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर तसेच जिल्हा परिषदेच्या सूचनाफलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यातील पात्र उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी येत्या 4 व 5 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, चामोर्शी रोड, गडचिरोली येथे केली जाणार आहे. दि.4 ला यादीतील अनुक्रमांक 1 ते 400 आणि दि.5 ला अनुक्रमांक 401 ते यादीतील अंतिम क्रमांकावरील उमेदवारापर्यंतच्या उमेदवारांनी कागदपत्रांच्या तपासणीसाठी उपस्थित राहायचे आहे.

अर्हता धारण केलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना नियुक्तीमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र किंवा जात प्रमाणपत्र, स्थानिक अनुसूचित जमातीचे उमेदवार असल्याचे सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य राहील. उमेदवाराचे वय 45 वर्षाच्या आत असणे गरजेचे आहे.

मुळ दस्ताऐवज तपासणीअंती पात्र ठरलेले उमेदवारच नियुक्तीकरीता पात्र राहतील. पात्र यादीतील ज्या उमेदवाराने विहीत अर्हता धारण केलेली नसल्यास त्यांनी मुळ दस्ताऐवज तपासणीकरीता उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही, तसेच मुळ दस्तावेज तपासणीकरीता उमेदवारांव्यतिरिक्त इतर कोणीही त्रयस्थ व्यक्तीने सभागृहात, तसेच सभागृहाच्या आवारात उपस्थित राहू नये, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांनी केले आहे.