जिल्ह्यातील तालुका क्रीडा संकुलांमध्ये विविध सुविधांसाठी वाढीव निधी मंजूर

मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे प्रयत्न

अहेरी : जिल्ह्यातील विविध तालुका क्रीडा संकुलांच्या विकास कामासाठी वाढीव निधी मिळण्यासाठी राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांना पत्र देऊन मागणी केली होती. त्यानुसार शासनाने जवळपास २२ कोटींचा वाढीव निधी मंजूर केला आहे. नव्याने मंजूर झालेल्या निधीचा वापर तालुका क्रीडा संकुलांमध्ये नव्या सुविधा निर्माण करण्यासाठी प्राधान्याने केला जाणार आहे.

जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात क्रीडा संकुलाचे बांधकाम या अगोदरच करण्यात आले आहे. मात्र काही तालुक्यातील क्रीडा संकुलांचे आणखी काही बांधकाम व अत्याधुनिक सुविधेसाठी वाढीव निधी आवश्यक असल्याने धर्मरावबाबा आत्राम यांनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना वाढीव निधीसाठी मागणीच्या अंदाजपत्रकासह प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर वाढीव निधी मागणीच्या अंदाजपत्रकासह कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करून त्यांनी ही मागणी रेटून धरली. अखेर धर्मरावबाबा यांच्या प्रयत्नांना यश आले असून जवळपास २२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास सहा तालुक्यातील क्रीडा संकुलाच्या विकास कामांसाठी हा निधी उपलब्ध झाला आहे. त्या ठिकाणी या निधीतून उर्वरित विकास कामे आणि अत्याधुनिक सुविधा निर्माण केल्या जातील.

कोणत्या तालुक्याला किती निधी?

अहेरी विधानसभा क्षेत्रातील चार क्रीडा संकुलाच्या आणि आरमोरी विधानसभा क्षेत्रातील दोन क्रीडा संकुलांच्या विकास कामांसाठी हा निधी मंजूर झाला आहे. त्यात मुलचेरासाठी ३.९३ कोटी, अहेरीसाठी ३.९३ कोटी, सिरोंचासाठी ३.९३ कोटी, एटापल्लीसाठी २.४३ कोटी रुपये, तसेच आरमोरीसाठी ३.७९ कोटी आणि देसाईगंजसाठी ३.९३ कोटी असा एकूण २१.९४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

जिल्ह्यातील काही क्रीडा संकुलाच्या विकासासाठी वाढीव निधीची आवश्यकता होती. त्याअनुषंगाने जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. सदर प्रस्ताव क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्याकडे पाठपुरावा करून मंजूर करून घेतला. सदर निधीचा वापर तालुका क्रीडा संकुलातील उर्वरित विकास कामे व नव्या सुविधा निर्माण करण्यासाठी होणार आहे. त्यामुळे त्या-त्या तालुक्यातील खेळाडूंना दिलासा मिळणार आणि नव्या सुविधा देखील उपलब्ध होणार आहेत.

– धर्मरावबाबा आत्राम
मंत्री, अन्न व औषध प्रशासन