३० वर्षापासून रखडलेल्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या बांधकामाचा मार्ग सुकर

मंजूर कामाचे खा.नेते यांच्याहस्ते भूमिपूजन

गडचिरोली : घोट येथील जवाहर नवोदय विद्यालयातील भवन निर्माण कार्याचे भूमिपूजन खा.अशोक नेते यांच्या हस्ते झाले. १८ कोटी रुपयांच्या खर्चातून या भवनाची उभारणी होणार आहे.

१८८६-८७ दरम्यान जवाहर नवोदय विद्यालयाची निर्मिती झाली. त्यानंतर १९९० पासून आजपर्यंत अनेक वर्षापासून शालेय इमारत, संरक्षण भिंतीचे बांधकाम, विद्यार्थ्यांचे वसतिगृह, शिक्षकांचे क्वॅार्टर्स व इतर बांधकामासह अत्याधुनिक सोयीसुविधांचे बांधकाम रखडलेले होते.

खासदार नेते यांनी दिल्लीत जवाहर नवोदय विद्यालयासाठी आयुक्त, नवोदय समिती यांच्याकडे पाठपुरावा करत जिल्हाधिकारी, वनखात्याचे अधिकारी, शालेय प्रशासन, नवोदय विद्यालय, जिल्हा प्रशासन तथा पालक संघ यांना संयुक्तपणे सूचना करून बैठका बोलावत रखडलेल्या कामाचा पाठपुरावा केला. त्यामुळे भवन निर्माण कार्याला मंजुरी मिळाली. तसेच याआधी वनखात्याच्या अटीशर्तीमुळे हे काम रखडलेले होते. यासाठी सुद्धा खा.नेते यांनी प्रयत्न करून हे काम मार्गी लावले.

या कार्यक्रमप्रसंगी मंचावर प्रामुख्याने आलापल्लीचे उपवनसंरक्षक राहुलसिंग टोलिया, प्राचार्य राजन गजभिये, घोटचे ठाणेदार निलेश गोहने, भाजपच्या महिला प्रदेश सचिव तथा जवाहर नवोदय कमिटीच्या सदस्य रेखा डोळस, भाजपचे जेष्ठ नेते नामदेव सोनटक्के, माजी जि.प.सदस्य तथा ज.न.वि.कमिटी सदस्य रोशनी पारधी, सरपंच रूपाली दुधबावरे, उपप्राचार्य विजय इंदुरकर, शहराध्यक्ष सोपान नैताम, रवींद्र भांडेकर, विलास उईके, कान्होजी लोहंबरे, आरिफ शेख आदी उपस्थित होते.

जवाहर नवोदय विद्यालयाकडे विशेष लक्ष

या भूमिपूजनप्रसंगी खा.अशोक नेते यांनी विद्यार्थ्यांच्या सफलतेसाठी मार्गदर्शन करत तीन गुरुमंत्र दिले. यात चिकाटी, ध्येय, सहनशिलता, आत्मविश्वास बाळगत विद्यार्थ्यांनी ध्येय निर्धारित करून जिद्दीने अभ्यास केला पाहिजे. सहनशिलता बाळगली पाहिजे, गुरुवर्यांच्या आदेशाचे पालन केले पाहिजे, असे मार्गदर्शन खा.नेते यांनी केले. याबरोबरच नवोदय विद्यालयामधील शालेय शिक्षण पूर्वीप्रमाणे दर्जेदार व्हावे यासाठी शिक्षकांनीसुद्धा मेहनत घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. आज भवनाच्या कामाला सुरूवात झाली, यापुढेही इतर सोयीसुविधांसाठी माझे काम सतत सुरू राहील, अशी ग्वाही खासदार ‌नेते यांनी याप्रसंगी दिली.