गडचिरोली : अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री म्हणून प्रभार घेतल्यानंतर शनिवारी संध्याकाळी ना.धर्मरावबाबा आत्राम प्रथमच गडचिरोलीच्या दौऱ्यावर आले. रविवारी त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी येणारा काळ सणासुदीचा असून या काळात जिल्ह्यातील नागरिकांना निर्भेळ, स्वच्छ व सुरक्षित अन्न मिळण्याकरिता विशेष मोहिमा आखून कारवाया करण्याच्या सूचना ना.धर्मरावबाबा यांनी केल्या. तसेच घाऊक व किरकोळ अन्न व औषध विक्रेत्यांची नियमितपणे तपासणी करण्याची सूचनाही त्यांनी दिली.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे गडचिरोली येथील कार्यालय सध्या बॅरेकमधील एका कक्षात आहे. या कार्यालयासाठी जिल्हा परिषदेच्या जवाहर भवनासमोर स्वतंत्र कार्यालयाकरिता जागा मंजूर झाली आहे. त्या जागेची पाहणी ना.आत्राम यांनी करून मंत्रालय स्तरारावरून इमारत बांधकामाकरिता आवश्यक निधी त्वरित उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.
यावेळी गडचिरोलीचे सहायक आयुक्त (अन्न) अभय देशपांडे, सहायक आयुक्त (मुंबई) उल्हास इंगावले, सहायक आयुक्त (औषधे) नीरज लोहकरे, औषध निरीक्षक नालंदा उरकुडे, अन्न सुरक्षा अधिकारी सुरेश तोरेम, तसेच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर व कर्मचारी उपस्थित होते.