आलापल्ली-नागेपल्लीच्या पाणी पुरवठा योजनेचे पाणी कुठे मुरत आहे?

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा सवाल

अहेरी : आलापल्ली आणि नागेपल्ली येथील नागरिकांसाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून बनविण्यात आलेली नळ पाणी पुरवठा योजना पूर्ण झाली. पण अद्याप ही योजना सुरू झाली नाही किंवा ग्राम पंचायतकडे हस्तांतरित झालेली नाही. त्यावरून या योजनेचे पाणी कुठे मुरत आहे? असा प्रश्न माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि आविचे नेते अजय कंकडालवार यांनी उपस्थित केला आहे. लवकरात लवकर घरोघरी पाणी पुरवठा सुरू केला नाही तर जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी आयुषी सिंग यांना निवेदनही सादर केले.

प्राप्त महितीनुसार, पाणी पुरवठा योजनेअंतर्गत टाकण्यात आलेले पाईपलाईन हे निकृष्ठ दर्जाचे असल्याने ते पाईपलाईन फुटून गेलेले आहेत. 15 व्या वित्त आयोगमधून ही नळजोडणी करण्यात आलेली आहे. परंतु कंत्राटदाराकडून त्या जोडणीमध्ये वापरण्यात आलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाईप फुटून पाणी वाया जात आहे. परिणामी नागरिकांना घराघरापर्यंत पाणी पोहोचू शकत नाही.

आलापल्ली येथील पाणीपुरवठा योजनेची कामे व्यवस्थित झालेली नाहीत. त्यामुळे प्रत्येक घरात पाणी पोहोचले नाही. तरीसुद्धा सरपंच व ग्रामसेवकाने ग्रामपंचायतमधील कोणत्याही सदस्याला, कमिटीला विश्वासात न घेता, ग्रामसभेत चर्चा न करता स्वतःच्या मर्जीने काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दिले, असा आरोप कंकडालवार यांनी केला आहे.

नळ जोडणी देताना अनेक ठिकाणी नालीच्या मधोमध व सांडपाण्याच्या मध्ये पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईन टाकण्यात आले. एवढेच नाही तर जास्तीचे पैसे दिल्याशिवाय कंत्राटदाराने पाईपलाईनची जोडणी करून दिली नसल्याचा आरोप केला जात आहे. घरोघरी पाणी देण्याचे शासनाचे, जिल्हा परिषदेचे स्वप्न असताना सहा महिन्यापासून घरोघरी पाणी मिळत नाही. या कामावर देखरेख करणाऱ्या उपअभियंत्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणत्याही कामावर न जाता मोजमाप पत्रिकेत नोंद घेऊन बिल काढले. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून जे पदाधिकारी किंवा अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आविसं अजयभाऊ मित्र परिवाराचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांनी केली आहे.