गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथे लॅायड्स मेटल्स अॅन्ड एनर्जी लि.या कंपनीकडून उभारण्यात आलेल्या लॉयड्स काली अम्माल स्मृती (एलकेएएम) हॉस्पिटलमध्ये पहिल्या बाळाचा जन्म झाला. याचा आनंद उत्सवाप्रमाणे साजरा करण्यात आला. बोडमेट्टा या गावातील अजय राजेश मिंज आणि बाली मिंज या दाम्पत्याचे हे बाळ आहे.
विशेष म्हणजे लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी हॉस्पिटलला भेट देऊन बाळाच्या पालकांचे आणि कुटुंबियांचे अभिनंदन करून आनंद व्यक्त केला. बाळ आणि बाळंतीण दोघांचीही प्रकृती ठणठणीत आहे.
30 खाटांच्या रुग्णालयातून उत्कृष्ट सेवा
लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनने त्यांच्या सीएसआर कार्यक्रमांतर्गत हेडरी येथे स्थापन केलेल्या या रुग्णालयाचे गेल्या ८ डिसेंबर २०२३ रोजी उद्घाटन करण्यात आले. परिसरातील नागरिकांना चांगल्या वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळत नसल्याने त्यांची गरज लक्षात घेऊन हे 30 खाटांचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात आले. यामुळे हेडरी आणि परिसरातल्या अनेक गावकऱ्यांच्या वैद्यकीय गरजा पूर्ण होत आहेत. नियमित वैद्यकीय उपचारांसोबत आकस्मिक सेवेसाठी अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी हे रुग्णालय सज्ज करण्यात आले आहे. रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर आणि गरजेनुसार भेट देणाऱ्या सल्लागार डॅाक्टरांच्या समर्पित टीममुळे हे रुग्णालय परिसरातील रुग्णांसाठी जीवनदायी ठरत आहे.