गडचिरोली : जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राचा प्रचार व प्रसार व्हावा, तसेच नवोदित खेळाडूंमध्ये क्रीडाविषयक आवड निर्माण व्हावी या उद्देशाने 26 एप्रिल ते 2 मे 2025 या कालावधीत जिल्हास्तरीय मोफत क्रीडा प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेले हे शिबिर जिल्हा क्रीडा संकुल, कॉम्प्लेक्स एरिया, गडचिरोली येथे होणार आहे.
या शिबिरात कुस्ती, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो आणि बॉक्सिंग या खेळांचा समावेश आहे. सकाळी 6 ते 8.30 आणि सायंकाळी 5 ते 7 या वेळेत अनुभवी क्रीडा मार्गदर्शक व प्रशिक्षकांकडून या खेळांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी शिबीर सुरू होण्यापूर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.
या शिबिराचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील विद्यार्थी व खेळाडूंनी शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.