देसाईगंज : येथील गांधी वॅार्डमधील रहिवासी आणि फर्निचर व्यावसायिक उमेश शिंगाडे (45 वर्ष) यांनी घरापासून काही अंतरावर असलेल्या आपल्या दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. या आत्महत्येमागे नेमके कोणते कारण आहे हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यांच्या परिवारात पत्नी, मुलगा-मुलगी, तसेच आई आणि भाऊ असे सदस्य आहेत.
प्राप्त माहितीनुसार, शिंगाडे यांनी रविवारी (दि.15) नेहमीप्रमाणे आपले फर्निचरचे दुकान उघडले होते. दुपारपर्यंत ते दुकानातच होते. पण दुपारी 3 वाजताच्या सुमारास काही ग्राहक साहित्य खरेदीसाठी दुकानात आले असताना त्यांना दुकानात कोणीच दिसले नाही. त्यामुळे त्यांनी आतमध्ये जाऊन पाहिले असता शिंगाडे हे छताला गळफास लावलेल्या अवस्थेत दिसले.
शिंगाडे यांनी आत्महत्या करण्यामागे व्यावसायिक कारण आहे, की कौटुंबिक हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे. देसाईगंज ठाण्याचे निरीक्षक अजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा तपास सुरू आहे.