गडचिरोलीच्या पारस राऊतने ऐतिहासिक कामगिरी करत पटकावले सुवर्ण

राष्ट्रीय वरिष्ठ गट बॅाक्सिंग स्पर्धेसाठी निवड

गडचिरोली : गडचिरोलीतील जिल्हा बॅाक्सिंग क्रीडा प्रशिक्षण केंद्राचा प्रशिक्षणार्थी पारस हरिदास राऊत याने गडचिरोलीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्याने अकोला येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गट पुरूष बॅाक्सिंग निवड चाचणीत ९२ किलो वजन गटात उत्कृष्ट प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले.
अंतिम लढतीत त्याने क्रीडा प्रबोधिनीच्या खेळाडूला पराजित करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपले नाव निश्चित केले.

येत्या २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान शिलांग येथे होणाऱ्या सातव्या वरिष्ठ गट राष्ट्रीय बॅाक्सिंग स्पर्धेसाठी त्याची निवड महाराष्ट्र बॅाक्सिंग संघात झाली आहे. वरिष्ठ गटात राष्ट्रीय पातळीवर गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणारा पारस हा पहिलाच बॅाक्सर आहे हे विशेष.

त्याला जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल, जिल्हा बॅाक्सिंग असोसिएशनचे जगदिश म्हस्के, यशवंत कुरूडकर, पंकज मडावी, रजत देशमुख, संतोष गैनवार, महेश निलेकार आदींनी मार्गदर्शन आणि शुभेच्छा दिल्या.