जान्हवीने स्वत:ला रेल्वेखाली झोकून देऊन आत्महत्या का केली?

रेल्वे पोलिस उलगडणार घटनेचे रहस्य

देसाईगंज : येथील खासगी महाविद्यालयात अकरावीला शिकणाऱ्या जान्हवी राजू मेश्राम (१७) या अल्पवयीन युवतीने वडसा रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर स्वत:ला रेल्वेखाली झोकून देऊन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येमागे कोणते कारण होते याचा उलगडा अद्याप झालेला नाही. रेल्वे पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

रेल्वे पोलिसांनी जान्हवीचा मोबाईल आणि तिची पर्स जप्त केली. त्यात कोणती सुसाईड नोट मिळाली नाही. शिवाय तिचा मोबाईल लॅाक होता. पण लवकरच तो अनलॅाक करून जान्हवीच्या आत्महत्येचे रहस्य उलगडणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

येथील भगतसिंग वॅार्डात राहणाऱ्या जान्हवीला बुधवारी तिच्या वडीलांनी रेल्वे स्टेशनच्या पलिकडे शिकवणीला सोडले होते. यादरम्यान वडसा स्थानकातून बल्लारशाहकडे जाणाऱ्या रेल्वेखाली जान्हवीने झोकून देऊन आत्महत्या केली. जान्ववीने आत्महत्येपूर्वी आपल्या व्हॅाट्स अॅपवर ‘फिनिश’ असे स्टेट्स ठेवले होते.